जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क): राजकारण आणी गुन्हेगारी या एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. कधी काळी राजकीय लोक गुन्हेगारांचा गरजेनुसार वापर करत होते. गुन्हेगारांच्या मसल पॉवरच्या माध्यमातून आपला स्वार्थ साधणारे तथा वापरकर्ते राजकीय लोक गुन्हेगारांना आश्रय देत होते. त्यामुळे साहजीकच समर्थक गुन्हेगारांना एक प्रकारे राजकीय अभय मिळत होते. हळू हळू काळ बदलत आणि सरकत गेला. काळानुसार या गुन्हेगारांचे मनोबल वाढत गेले. त्यानंतर त्यांची धनसंपत्ती देखील वाढत गेली. त्यामुळे गुन्हेगारांना देखील राजकीय सत्तेची लालसा खुणावू लागली. राजकीय लोकांना गुन्हेगारांची गरज लागत असल्यामुळे बदलत्या काळाची गरज ओळखून गुन्हेगारांना देखील सत्तेची दारे व खिडक्या हळू हळू खुली करण्यात आली. वाढत्या गुन्हेगारीमुळे राजकारणात सुशिक्षीत मनुष्य सहसा येत नाही. त्याचा देखील फायदा गुन्हेगार घेऊ लागले. एकंदरीत 80% विखुरलेल्या सुशिक्षीतांवर एकवटलेले 20 टक्के गुन्हेगार जणूकाही राज्य करु लागले.
भुसावळ शहरात देखील असेच काहीसे चित्र बघायला मिळते. भुसावळ शहारातील कष्टकरी समाज दिवस निघाला म्हणजे आपला भोजनाचा डबा पिशवीत घेऊन कामधंद्याला अथवा नोकरीला जातो. हा 80% कष्टकरी समाज विखुरलेला आहे. या विखुरलेल्या कष्टकरी समाजावर एकवटलेल्या 20% गुन्हेगारी घटकाचे राज्य असल्याचे म्हटले जाते. हा 20 टक्के गुन्हेगारी घटक देखील आता वर्चस्वाच्या लढाईत मग्न झाला आहे. प्रस्थापित गुन्हेगाराला नवागत गुन्हेगाराचे वर्चस्व सहन होत नाही. एखादा गुन्हेगार प्रगती करु लागला म्हणजे प्रस्थापित गुन्हेगार त्याचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतांना दिसतो. समाजात केवळ आपलेच वर्चस्व अबाधीत रहावे यासाठी प्रत्येक गुन्हेगार प्रयत्नशिल असल्याचे दिसून येते. त्यातून कित्येकदा खूनाची घटना देखील घडते. भुसावळच्या जनतेने अशा स्वरुपाच्या खूनाच्या अनेक घटना पाहिल्या आहेत.
मे महिना म्हटला म्हणजे भुसावळ शहराचे तपमान पंचेचाळीशी देखील पार करते. त्यामुळे भुसावळ शहरात मे महिन्यात पाण्याची टंचाई देखील जाणवते. आपल्या वार्डात टॅंकरद्वारे पाणीपुरवठ्याच्या माध्यमातून श्रेय घेण्याची संधी व या संधीचा फायदा काही राजकीय पुढारी घेत असतात. त्यातून काही ठिकाणी वाद घालून आपले वर्चस्व दाखवण्याचे काम काही आडंदाड वृत्तीचे लोक करत असतात. जनतेची सेवा करण्याच्या बहाण्याने श्रेय, वर्चस्व, अस्तित्व हे घटक पुढे येतात.
भुसावळ शहरातील जामनेर रोडवर स्व. मोहन पहेलवान नगर आहे. या परिसरात संतोष मोहन बारसे हा भाजपचा माजी नगरसेवक रहात होता. माजी नगरसेवक असलेल्या संतोष बारसे यास उन्हाळ्याच्या दिवसात वार्डातील जनतेसाठी पाण्याची सोय करायची होती. माजी नगरसेवक संतोष बारसे याचा सुनिल राखुंडे हा समर्थक कार्यकर्ता होता. संतोष आणि सुनिल हे दोघे नेहमी सोबत असायचे.
मे महिन्याच्या अखेरीस वाल्मीक नगर वार्डात माजी नगरसेवक संतोष बारसे याच्या प्रयत्नातून रहिवासी जनतेसाठी पाण्याचे टॅंकर आले होते. त्यावेळी प्रतिस्पर्धी गटातील सोनू रायसिंग पंडीत, आकाश रायसिंग पंडीत, गोलू पंडीत, सोनू पथरोड आदींनी धटींगशाही करत टॅंकर अडवला. त्यांनी टॅंकरचालकास थांबवून त्याच्या ताब्यातील टॅंकर ते स्वत:च्या घरी घेऊन गेले. त्यामुळे पाण्याचे रिकामे हंडे, बादल्या घेऊन आलेले रहिवासी रिकाम्या हाती घरी गेले. त्यामुळे संतोष बारसे हा टॅंकर अडवणा-या सर्वांकडे वार्डातील काही लोकांसोबत गेला. आमच्या वार्डातील लोकांना पाण्याची गरज असतांना हे टॅंकर तुम्ही एकटेच स्वत:च्या घरी कसे काय घेऊन आले असा प्रश्न संतोषने त्यांना विचारला.
त्यावर “तु कौन होता है हम को बोलनेवाला” असे बोलून सर्वानी संतोषला शिवीगाळ सुरु केली. यावेळी गोलू पंडीत इतर साथीदारांना उद्देशून म्हणाला की “राजु सुर्यवंशी को फोन लगाव, आज इसका खटका मिटा देते है”. तेव्हा संतोष याच्या सोबत आलेल्या वार्डातील काही लोकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. तरी देखील त्या सर्वांनी संतोषला धमकी दिली होती की “तुला जास्त झाली आहे आम्ही तुला जिवंत सोडणार नाही”. त्यानंतर कसाबसा वाद मिटवत सर्वजण आपापल्या घरी परतले.
त्यानंतर दिनांक 28 मे 2024 रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास संतोष बारसे याचा समर्थक सुनिल राखुंडे याने पाण्याचे टॅंकर स्व. मोहन पहेलवान नगर परिसरात आणले. त्यावेळी प्रतिस्पर्धी गटातील विष्णू पथरोड, शिव पथरोड, करन पथरोड, नितिन पथरोड व इतर अनोळखी तरुणांनी एकत्र येत आलेल्या पाण्याच्या टॅंकरचे टायर फोडून तोडफोड केली. हा प्रकार माजी नगरसेवक संतोष बारसे यास समजला. त्यामुळे त्याने विष्णु पथरोड याच्या घराकडे धाव घेतली. त्याठिकाणी बंटी पथरोड हा देखील हजर होता. टॅंकरचे नुकसान का केले याबाबत संतोषने त्यांना विचारणा केली. त्यावेळी बंटी पथरोड, शिव पथरोड आणि विष्णू पथरोड असे एकत्र आले. तिघांनी संतोष बारसे यास म्हटले की आमचा बॉस राजु सुर्यवंशी आहे. त्याने आम्हाला सांगितले आहे की तेरा विषय हम खत्म कर देंगे, तुझे मार डालेंगे. आपल्याला जीवे ठार मारण्याची धमकी मिळाल्यानंतर माजी नगरसेवक संतोष बारसे घरी परतला. घरी आल्यावर त्याने घरातील सदस्यांना सर्व घटनाक्रम कथन केला. राजू सुर्यवंशीने मेरी फिल्डींग लगायी है, तुम लोग सावधान रहो असा इशारा त्याने दिला.
दुस-या दिवशी 29 मे 2024 रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास संतोष बारसे याचे सुनिल राखुंडे याच्यासोबत वरणगाव येथे एका परिचीताच्या वाढदिवसाला जाण्याचे नियोजन होते. त्यादृष्टीने संतोष अगोदर सुनिल राखुंडे याच्या घरी गेला. त्याठिकाणी दोघे सोबत गप्पाटप्पा करत बसले. त्यानंतर सुनिल राखुंडे याने स्विफ्ट डिझायर कारच्या स्टेरिंगचा ताबा घेतला. त्याच्या बाजुला संतोष बारसे बसला. दोघांच्या हालचालींवर त्यांचे हल्लेखोर लक्ष ठेवत टपून बसलेले होते.
दोघे जण मोरेश्वर नगरपासून गांधी पुतळ्याच्या दिशेने कारने जाण्यास निघाले. वाटेत मरिमाता मंदीरासमोर त्यांच्या हालचालींवर टपून बसलेल्या शिव पथरोड, विष्णू पथरोड, विनोद चावरीया, सोनू पंडीत, करन पथरोड, नितीन पथरोड व इतर काहीजणांनी दोघांची कार अडवली. हे सर्व मोटार सायकलस्वार संतोष आणि सुनिल या दोघांची वाटच बघत होते. शिव, विष्णु, विनोद, सोनु, करण, नितीन अशा सहा जणांनी कारमधे बसलेल्या संतोष आणि सुनिल या दोघांच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारीच्या घटनेत संतोष बारसे आणि सुनिल राखुंडे हे दोघेजण रक्ताने लथपथ झाले. त्याचवेळी त्यांच्या कारच्या मागे मागे त्यांचे सहकारी सागर बारसे आणि प्रफुल पाटील हे देखील येत होते. गोळीबारीची घटना बघून सागर बारसे आणि प्रफुल पाटील हे दोघे तरुण घाबरले.
या घटनेनंतर गोळीबार करणारे सहाही जण भारत नगरमधे परतले. तेथेही त्यांनी हवेत गोळीबार करुन परिसरात दहशत निर्माण केली. त्यामुळे त्यांना जगन लबदे यांनी जाब विचारला. मात्र त्याच्या दिशेने देखील गोळीबार करण्यात आला. त्यात जगन लबदे हे जखमी झाले. दरम्यान मरिमाता मंदीरासमोर झालेल्या गोळीबारात संतोष बारसे आणि सुनिल राखुंडे हे दोघे जण जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांच्या कारच्या मागे असलेले सागर बारसे आणि प्रफुल पाटील या दोघा घाबरलेल्या तरुणांनी या घटनेची माहिती संतोषचा भाऊ मिथुन बारसे याला येऊन सांगितली. दरम्यान या घटनेची माहिती भुसावळ शहर पोलिसांना समजली होती. तत्कालीन पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे व त्यांच्या सहका-यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाईला सुरुवात केली. दरम्यान दहशतीमुळे परिसरातील दुकानदारांनी आपली दुकाने पटापट बंद केली. दरम्यान घटनास्थळी पोलिस उप अधिक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक गजानन पडघन, ग्रेड पीएसआय कंखरे, मोहम्मद अली सैय्यद, पोलिस नाईक समाधान पाटील, हे.कॉ. विनोद नेवे, पो.कॉ. किशोर इंगळे, दिपक शेवरे, बाजारपेठ पोलिस स्टेशनचे डीबी पथक आदींनी घटनास्थळाला भेट दिली.
रक्ताच्या थारोळ्यातील संतोष बारसे आणि सुनिल राखुंडे या दोघांना लोकांच्या मदतीने अॅंब्युलंसने ट्रामा केअर सेंटर मधे नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासले असता दोघांचा श्वासोश्वास अगदी धिम्या गतीने सुरु असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना दुस-या दवाखान्यात घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना डॉ. मानवतकर यांच्या दवाखान्यात आणले. याठिकाणी डॉक्टरांनी दोघांना तपासून मयत घोषित केले. त्यानंतर दोघांना पुन्हा ट्रामा सेंटर व तेथून जळगावला शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात नेण्यात आले. याठिकाणी त्यांच्यावर पोस्टमॉर्टम करण्यात आले.
या घटनेप्रकरणी मयत संतोष बारसे याचा लहान भाऊ मिथुन मोहन बारसे याने दिलेल्या फिर्यादीनुसार भुसावळ शहर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भाग 5 गु.र.न. 118/24 भा.द.वि. 302,120 (ब), 143,147, 148,149, आर्म अॅक्ट 3/25, 27 म.पो. अधिनियम 37 (1) (3) चे उल्लंघन 135 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. रिपाईचे जिल्हाध्यक्ष राजु भागवत सुर्यवंशी व बंटी पथरोड या दोन मुख्य संशयीत आरोपींसह इतरंविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिस तपासात निष्पन्न झाल्यानुसार क्रमाक्रमाने शिव पथरोड, विष्णू परशुराम पथरोड, विनोद लक्ष्मण चावरीया, जयसिंग उर्फ सोनु रायसिंग पंडीत, करण किसन पथरोड, नितिन जगदीश पथरे (पथरोड), किरण वसंत कोळी, धरमसिंग उर्फ गोलु पंडित, सोनु पथरोड अशा सर्व संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्ह्यातील एका बड्या हॉस्पीटलच्या सफाईचा ठेका या खून प्रकरणातील संशयीत आरोपी शिव पथरोड याच्याकडे होता असे समजते. तो ठेका संतोष बारसे याने त्याच्या जवळच्या एका मित्राला मिळवून दिला होता असे देखील समजते. हा ठेका हातातून गेल्यामुळे शिव पथरोड याचा संतोष बारसे याच्यावर राग होता असे देखील म्हटले जात आहे. त्यामुळे या ठेक्याच्या वादाची देखील एक किनार या खूनामागे असल्याचे बोलले जात आहे. तसेच वर्चस्वासह आपसी दुश्मनी, जुने वाद या खूनामागे असल्याचे म्हटले जात आहे.
या घटनेतील करण पथरोड यास नाशिकच्या गुंडविरोधी पथकाच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. अंगझडती दरम्यान त्याच्याकडून दोन गावठी पिस्टल व पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. विनोद चावरीया व राजू सुर्यवंशी या दोघांना साक्री येथून ताब्यात घेत अटक करण्यात आली.
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अटकेतील संशयितांना भुसावळ न्यायालयात न आणता रात्रीच रेल्वे न्यायालयात आणले गेले. रात्रीच्या वेळी रेल्वे न्यायालयात हे कामकाज चालवण्यात आले. सरकारी वकील अॅड. नितीन खरे यांनी सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयीन कामकाज पाहिले. भुसावळमधे न्यायालयाचे कामकाज सुरक्षेच्या दृष्टीने रात्री व ते देखील रेल्वे न्यायालयात चालवण्यात आल्याची ही पहिलीच घटना आहे. अटकेतील रिपाई जिल्हाध्यक्ष राजु सुर्यवंशी, विनोद चावरीया आणि करण पथरोड या तिघांना भुसावळ न्यायालयात आणले जाणार असा अंदाज होता. त्यासाठी न्यायालयात संशयीतांना बघण्यासाठी गर्दी जमली होती. मात्र जमलेल्या लोकांची निराशा झाली.
खूनाच्या घटनेनंतर भारत नगर येथे जावून हवेत गोळीबार केल्याप्रकरणी संशयीत करण पथरोड व शिव पथरोड या दोघांविरुद्ध शहर पोलिस स्टेशनला दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचे कामकाज स.पो.नि. निलेश गायकवाड करत आहेत. अटकेतील संशयीत करण पथरोड याने मध्यप्रदेशातून तिन गावठी पिस्टल विकत आणल्याचे तपासात पुढे आले. ती पिस्टल त्याने अकलुद ता. यावल येथील रहिवासी व रेकॉर्डवरील गुन्हेगार किरण कोळी याच्याकडे ठेवली होती. किरण कोळी याच्याविरुद्ध प्रियकरासमोर त्याच्या प्रेयसीवर अत्याचार केल्याचा एक गुन्हा फैजपूर पोलिस सटेशला दाखल आहे. या गुन्ह्याचे न्यायालयीन कामकाज सरकारी वकील अॅड. नितीन खरे बघत आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास भुसावळ शहर पोलिस स्टेशनचा नव्याने कारभार हाती घेतलेले तरुण पोलिस निरीक्षक राहुल वाघ व त्यांचे सहकारी करत आहेत. या घटनेतील शिव पथरोड आणि बंटी पथरोड हे दोघे फरार असून पोलिस पथक त्यांच्या मागावर आहेत.