जळगाव : घरफोडी करणा-या अटकेतील दोघा आरोपींकडून त्यांनी चोरी केलेल्या मुद्देमालातील 70 ग्रॅम सोने व 100 ग्रॅम चांदी मध्य प्रदेशातून जप्त करण्यात आली आहे. वेगवेगळ्या घरफोडीप्रकरणी फैजपूर पोलिस स्टेशनला दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलिस उप निरीक्षक मनुद्दीन सैय्यद यांच्याकडे तपास असलेल्या गुन्ह्यात एकुण 3,03,000/- रुपये रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने असा मुद्देमाल चोरीस गेला होता. याशिवाय दुस-या घरफोडीच्या गुन्ह्यात एकुण 1 लाख 28 हजार रुपये रोख व सोन्या चादीचे दागिने असा मुद्देमाल चोरीस गेलेला होता. या गुन्हयाचा तपास पोहेकॉ. रविद्र मोरे करत होते.
तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासले असता धुळे जिल्ह्याच्या शिरपूर शहर पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील दोघा अटक आरोपींच्या वर्णनात साम्य आढळून आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरपूर शहर पोलिस स्टेशनला जावून चौकशी केली असता तेथील दोघा अटक आरोपींनी या गुन्ह्यांची कबुली दिली. त्यामुळे राजेंद्रसिंग उर्फ राजन प्रितमसिंग बरनाला आणि ईश्वरसिंग नुरबिनसिंग चावला (दोघे रा.उमर्टी ता.वरला जि. बडवाणी मध्य प्रदेश) यांना पोलिस उपनिरीक्षक मैन्नुद्दीन सय्यद यांच्यासह पथकाने कायदेशीर पुर्ततेअंती शिरपुर शहर पोलीसांच्या ताब्यातून फैजपूर पोलिस स्टेशनच्या ताब्यात घेतले.
दोघांनी दिलेल्या कबुलीनुसार फैजपूर पोलिस स्टेशनला दाखल दोन, रावेर पोलिस स्टेशनला दाखल दोन, यावल पोलिस स्टेशनला दाखल दोन, अडावद पोलिस स्टेशनला दाखल एक असे एकुण सात गुन्हे उघडकीस आले आहेत. मध्य प्रदेशातील इंदोर येथून चोरी केलेल्या मुद्देमालापैकी 70 ग्रॅम सोने व 100 ग्रॅम चांदी असा एकुण 3,55,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटकेतील आरोपींनी जळगाव जिल्ह्यात एकुण दहा गुन्हे केले आहेत.