जळगाव : सार्वजनिक ठिकाणी पायी चालतांना मोबाईलवर बोलणाऱ्या महिलांच्या हातातील मोबाईल हिसकावून पलायन करणाऱ्या दोघा गुन्हेगारांना शनिपेठ पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. जाकीर शहा युनूस शहा आणि इमरान शहा फिरोज शहा अशी या दोघांची नावे आहेत. पायी पेट्रोलिंग करत असताना शनीपेठ पोलिस स्टेशन पथकाच्या संशयी नजरेने फिरणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले असता ते दोघे मोबाईल चोरटे असल्याचे निष्पन्न झाले.
शनिपेठ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोहेकॉ विजय खैरे, पोना विजय निकम, पोकॉ अनिल कांबळे, पोकॉ मुकुंद गंगावणे, पोकॉ विकी इंगळे असे दिनांक 15 जुलैच्या रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास पायी पेट्रोलींग करत होते. त्यावेळी जाकीर शहा युनुस शहा (रा. अल्फसा मशिदजवळ फातीमानगर, एमआयडीसी परीसर जळगाव) आणि इम्रानशहा फिरोज शहा (मुळ रा. मेनगाव ता. जामनेर हल्ली रा. टिपु सुलतान चौक, तांबापुरा जळगाव) या दोघांच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या.
दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जात ओपो, विवो आदी कंपन्यांचे पाच महागडे अँड्रॉइड मोबाईल हँडसेट आढळून आले. तसेच त्यांच्या ताब्यातील मोटरसायकलचा चेसिस नंबर खोडलेला होता. त्यामुळे त्यांच्यावरील संशय अधिक प्रमाणात बळावला. त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. मात्र पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्यासमोर त्यांचा निभाव लागला नाही. त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
शनिपेठ पोलिस स्टेशनला दाखल गु.र.नं. 157/2024 महाराष्ट्र पोलीस अधिनयम कलम 122, 124 अन्वये दाखल गुन्हा उघडकीस आला आहे. दोघांच्या कब्जात असलेले मोबाईल हॅन्डसेट हे दिनांक 7 जून 2024 रोजी जळगाव शहरातील सागर पार्क मैदान, गिरणा टाकी तसेच विविध परिसरात महिलांच्या हातातून हिसकावून घेतल्याची कबुली त्यांनी दिली आहे. अशा पद्धतीने मोबाईल हिसकावून नेण्याची अटकेतील दोघा गुन्हेगारांची गुन्हा करण्याची कार्यपद्धती आहे.
अटकेतील दोघा आरोपीतांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पो. नि. रंगनाथ धारबळे यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास हे. कॉ. इंदल जाधव करत आहेत. गुन्हा करतांना वापरलेली बजाज प्लॅटीना मोटार सायकल पुढील तपासणी जप्त करण्यात आली आहे.
दिनांक 7 जुलै 2024 रोजी रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या मोबाईल स्नॅचिंगच्या दोन गुन्ह्यात या दोघांचा सहभाग असल्याचे निश्चित झाले आहे चोरून नेलेल्या एका मोबाईलचा पॅटर्न लॉक विविध प्रयत्न करून त्यांनी तो उघडला. तसेच फोन पे द्वारे चोरीच्या मोबाईल मधून फिर्यादीच्या बँक खात्यातून 1500 रुपये काढून घेण्यात आल्याचे देखील उघडकीस आले आहे.