जळगाव : बंद घराचा कडीकोंडा तोडून घरफोडी करणाऱ्या चोरट्यास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. अविनाश बन्सीलाल पाटील असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील कुसुंबा येथे झालेल्या या घरफोडी प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कुसुंबा येथील सद्गुरु नगर परिसरातील रहिवासी फोटोग्राफर सौभाग्य चित्तरंजन सेनापती हे उज्जैन येथे सहपरिवार देवदर्शनासाठी गेले होते. 2 ते 6 जुलै या कालावधीत त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञाताने घरफोडी केली होती. सौभाग्य सेनापती हे घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांच्या राहत्या घराच्या बेडरुममधील कपाटातुन 2,68,600/- रु किंमतीचे सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम 15,000/- रूपये चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेप्रकरणी सेनापती यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांच्या पत्नीला घराच्या कपाटातील पर्समधे 33,100 रुपयांचा मुददेमाल आढळून आला. एकंदरीत 2,34,900/- रुपयांचा एकूण मुददेमाल चोरीस गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला. तपासा दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अविनाश बन्सीलाल पाटील यास ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी करण्यात आली. त्याने आपला गुन्हा कबुल केला. या घरफोडीतील चोरी झालेल्या एकुण 2,34,900 रुपये किमतीच्या मुद्देमालांपैकी 2,19,900 रुपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, दिपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ किरण पाटील, पोना किशोर पाटील, विकास सातदिवे, पोका गणेश ठाकरे, पोकॉ सिद्धेश्वर डापकर, पोकॉ चंद्रकांत पाटील, साईनाथ मुंडे आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.







