रुग्णवाहिकेअभावी पुण्यातील पत्रकाराचा दुर्दैवी मृत्यू

पुणे : मोठ्या धुमधडाक्यात बड्या नेत्यांच्या उपस्थितीत पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचे उद्घाटन झाले. कोविड रुग्णांना वेळेत उपचार मिळतील असेही त्यावेळी सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी असल्याचे पुण्यातील टीव्ही 9 चे पत्रकार पांडुरंग रायकर (42) यांच्या निधनाने अधोरेखीत झाले आहे.

वेळेत उपचार मिळाले नाही म्हणून पुणे येथील टीव्ही 9 या वृत्तवाहिनीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचे निधन झाल्याची ओरड होत आहे. पांडुरंग रायकर यांना 20 ऑगस्ट रोजी थंडी आणि तापाचा त्रास होवू लागला. त्यांनी डॉक्टरांकडे जावून उपचार घेतले. 27 ऑगस्ट रोजी त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्या तपासणीत अहवाल निगेटीव्ह आला. 28 ऑगस्ट रोजी रायकर अहमदनगर जिल्हयातील कोपरगाव येथे गेले. मात्र त्यांचा त्रास कमी झाला नाही. त्यामुळे त्यांनी कोपरगाव येथे अँटिजेन टेस्ट केली असता त्यात अहवाल पॉझिटिव्ह आला.

30 जुलै रोजी पुणे येथील जम्बो हॉस्पीटल येथे दाखल करण्यत आले. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होण्याचे नाव घेत नव्हती. मंगळवारी त्यांची ऑक्सिजनची लेव्हल अगदीच कमी झाली. त्यामुळे जम्बो हॉस्पीटलमधून दुस-या हॉस्पीटलमधे नेण्यासाठी तेथे रुग्णवाहिका नव्हती. रुग्णवाहिका मिळवण्यासाठी रात्री प्रयत्न सुरुच होते. एक रुग्णवाहीका मिळाली मात्र त्यात व्हेंटीलेटर नादुरुस्त होता असे सांगण्यात येत आहे. अजुन दुसरी रुग्णवाहिका मिळाली मात्र त्यात डॉक्टर हजर नव्हते. या सर्व घटनाक्रमात रात्रीचे सव्वा बारा वाजून गेले. पहाटे चार वाजेच्या सुमारास पुन्हा रुग्णवाहिका मिळवण्यासाठी प्रयत्न सुरुच होते.

अखेर मंगेशकर हॉस्पिटलकडून पहाटे पाच वाजता एक रुग्णवाहिका उपलब्ध असल्याचे समजले. या कालावधीत सकाळी पाच वाजता पत्रकार रायकर यांचे निधन झाले. यंत्रणेतील समन्वयाचा अभाव असल्याचे या घटनेतून पुढे आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here