जळगाव दि. १७ (प्रतिनिधी) – ‘महात्मा गांधीजींचे मूल्य जीवनात अनुसरा, सत्य, निष्ठा आणि परिश्रम यावर विश्वास ठेवा आणि ग्राम विकासात आपले मोलाचे योगदान करा.’ असे आवाहन प्रो. लीला वसारिया यांनी विद्यार्थ्यांना केले. गांधी रिसर्च फाउंडेशन संचलीत शाश्वत ग्रामीण पुनर्रचना विषयावर पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमास आज जैन हिल्स येथे एका छोटेखानी कार्यक्रमात आरंभ झाला. त्यावेळी त्या उद्घाटक म्हणून उपस्थितांशी संवाद साधत होत्या. या प्रसंगी व्यासपीठावर अशोक भार्गव, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुदर्शन आयंगार आणि सौ. अंबिका जैन उपस्थित होते.
गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी अनिलेश जगदाळे यांनी साने गुरुजींची रचना ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे…’ सादर केली. या अभ्यासक्रम आरंभ उद्घाटन आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आले. सामान्यपणे पाहुणे व मान्यवरांच्याहस्ते एक समयी प्रज्ज्वलीत करण्याची रिती आहे. पाहुण्यांसह या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या हातात दीपक देण्यात आला होता व ज्योतीने ज्योत पेटवून अनेक दिवे प्रज्ज्वलीत झाले. यावेळी ‘ज्योत से ज्योत लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो…’ या गाण्याचे मंद स्वर भारलेले वातावरण निर्माण करून गेले. आरंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाबाबतची पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे डॉ. आश्विन झाला यांनी माहिती देऊन संस्थेचा परिचय करून दिला.
कार्यक्रमास लाभलेले प्रमुख पाहुणे अशोक भार्गव यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधला. प्रगती साध्य करणाऱ्या जपानच्या कौटुंबीक आणि एकटेपणाने जगणाऱ्यांच्या समस्या सांगितल्या. कामाच्या तणावात तरुण लग्न न करता एकटे राहणे पसंत करतात व त्यामुळे त्यांच्या लोकसंख्येवर विपरीत परिणाम होत आहे एका वेगळ्याच प्रश्नांना जपान सामोरी जात आहे. अशा वेळी महात्मा गांधीजींचे तत्त्व उपयुक्त ठरतात असे सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञान व अनुभवाचा सुयोग्य वापर करून प्रगतीमध्ये आपला वाटा उचलावा असे सांगितले. भार्गव यांनी त्यांच्या सुमधूर आवाजात ‘आसमां पे हे खुदा और जमी पे हम….’ आजच्या परिस्थितीचे वास्तव सांगणारे गाणे म्हटले. यावेळी सुदर्शन आयंगार आणि अंबिका जैन यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक मिश्रा यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांसह गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी उपस्थित होते.