जळगाव : गावठी कट्टयासह फोटो काढणारा व तो कट्टा लपवणारा अशा दोघांना शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. गणेश हिमंत कोळी रा. मोहाडी मुळ रा. धानोरा ता. चोपडा असे कट्टा बाळगणाऱ्या आणि त्याच्या सोबत फोटो काढणाऱ्याचे नाव आहे. विनय जितेंद्र कोळी असे गावठी कट्टा लपवून ठेवणाऱ्या त्याच्या साथीदाराचे नाव आहे.
गोपनीय बातमीदाराकडून फोटोसह मिळालेल्या माहितीनुसार एक तरुण गावठी कट्टा आपल्या कब्जात बाळगत असल्याची माहिती शनिपेठ पोलिसांना समजली होती. तसेच हा तरुण नेरी नाका परिसरात वावरत असल्याची देखील माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या पथकातील पो.उप. निरी चंद्रकांत धनके, पोकॉ अनिल कांबळे, पो. कॉ मुकुंद गंगावणे पो.कॉ विकी इंगळे, पो. कॉ रविंद्र साबळे, पो कॉ अमोल वंजारी आदींनी नाका परिसरातून गणेश कोळी यास शिताफिने अटक केली.
आपण गावठी कट्टयासह काही दिवसांपूर्वी काढलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता अशी कबुली त्याने दिली. तो गावठी कट्टा आपला मित्र विनय कोळी याच्याकडे लपवून ठेवला असल्याची देखील माहिती त्याने पोलीस पथकास दिली. पोलीस पथकाने विनय कोळी याचा शोध घेऊन त्याची विचारपूस केली असता शेतातील जनावरांच्या कुट्टीत लपवून ठेवलेला गावठी कट्टा त्याने काढून दिला.