चोरीच्या नव्या ट्रॅक्टरने वाळूची वाहतुक चोरटी — एलसीबी पथकाने शोधला रेकॉर्डवरील चोरटा!

जळगाव : गोडावून मधून चोरी झालेल्या नव्या ट्रॅक्टरचा वापर वाळूच्या चोरट्या वाहतूकीसाठी सुरु होता असे एका गुन्ह्याच्या तपासात उघडकीस आले आहे. एलसीबी पथकाने नुकताच एक ट्रॅक्टर चोरटा जेरबंद केला आहे. मौसीम खान अय्युबखान (रा. शाहुनगर जळगाव) असे अटकेतील ट्रॅक्टर चोरट्याचे नाव आहे.

सध्या जळगाव तालुका परिसरात  ट्रॅक्टर चोरीचे गुन्हे वाढले असून एलसीबी पथक अशा चोरीच्या गुन्ह्यांचा तपास देखील लावत आहे. काही दिवसांपुर्वी एका ट्रॅक्टर चोरीचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावला. त्यानंतर आता नव्याने केलेल्या तपासाअंती एका  ट्रॅक्टर चोरट्यास अटक केली असून एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

एमआयडीसी परिसरात एक ट्रॅक्टर गोडाऊन असून त्यागोडावून मधून 7 डिसेंबर 2022 रोजी एक नवे ट्रॅक्टर चोरी झाले होते. या चोरीप्रकरणी 2 एप्रिल 2024 रोजी एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार  विजय पाटील यांच्याकडे देण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास एलसीबी पथक करत होते. एलसीबी पथकातील अधिनस्त पोलीस अंमलदार जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, बबन पाटील याच्यावर ट्रॅक्टर चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

हा गुन्हा पोलिसांच्या अभिलेख्यावरील गुन्हेगार मौसीम खान अय्युबखान याने केल्याचे गोपनीय बातमीदाराने या पथकाला दिली. त्या माहितीच्या आधारे मौसीम खान यास शिताफीने ताब्यात घेत त्याची सखोल चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केला. हे चोरीचे ट्रॅक्टर वाळू वाहतूकीसाठी वापरले जात होते. तसेच हे ट्रॅक्टर तालुका पोलिस स्टेशनला वाळू चोरीच्या गुन्ह्यात जप्त असल्याची देखील माहिती पुढे आली. अटकेतील मौसीम खान यास पुढील कारवाईकामी एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here