नाशिक : अवैध मद्य तस्करीतून झालेल्या हत्येच्या गुन्ह्यातील आणखी एका जणास नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तळोदा – नंदुरबार येथून अटक केली आहे. दि. 7 जुलै 2024 रोजी रात्रीच्या सुमारास चांदवड-मनमाड रोडवर अवैधरित्या मद्यसाठयाची वाहतुक करणा-या कारने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्कॉर्पिओला धडक दिली होती. या धडकेत राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे जवान जागीच ठार झाले होते. याशिवाय लासलगाव पोलीस स्टेशनचे दोघे पोलीस अंमलदार देखील गंभीर जखमी झाले होते.
या घटनेप्रकरणी चांदवड पोलीस स्टेशनला गु.र.नं. 273/24 भारतीय न्याय संहीता कलम 103(1), 109, 132, 238, 324(4), 121 (1), (2), 3 (5), 61 (2) सह मोटर वाहन का. क. 183, 184, 134(अ),(ब)/177, 79(1), 61 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी या घटनेची तातडीने दखल घेत या घटनेतील गुन्हेगारांना तातडीने अटक करण्याकामी जिल्ह्यासह पर राज्यात पथकांची रवानगी केली होती.
पोलीस पथकांनी या गुन्ह्यातील संशयीत आरोपी देवीश पटेल, अशपाक अली शेख, राहुल सहाणी, शोहेब अन्सारी या चौघांना अटक केली होती. उर्वरित आरोपींच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी नंदुरबार जिल्हयातील तळोदा परिसरात सातत्याने पाळत ठेवून संशयीत आरोपी भावेशकुमार मोहनभाई प्रजापती (सुरत) यास तळोदा – नंदुरबार येथून अटक केली. घटनेच्या दिवशी मद्य तस्करी करणा-या वाहनांच्या ताफ्यात भावेशकुमार याचा समावेश होता. तो मुख्य क्रेटा कारसोबत त्याच्या ताब्यातील किया सोनेट कारमध्ये मद्यसाठ्याची अवैधरित्या वाहतुक करत होता. गाडी थांबवण्याचा त्याला इशारा केला असता तो पोलीसांना हुलकावणी देत फरार झाला होता.
या गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे व त्यांचे पथक करत आहे. नाशिक जिल्हयाच्या सीमावर्ती भागातून होणा-या अवैध मद्य तस्करीची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे तातडीने कारवाई करण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. राजु सुर्वे, पोउनि नाना शिरोळे, पोहवा गणेश वराडे, मुकेश महिरे, धनंजय शिलावटे, पो.ना. संदिप झाल्टे, तसेच तांत्रिक विश्लेषन विभागाचे पोना प्रदिप बहिरम, हेमंत गिलबिले, भाउसाहेब टिळे यांच्या पथकाने या कामगिरीत सहभाग घेतला.