तरुणाचे अपहरण करणा-या दोघांना अटक, अल्पवयीनाची बालसुधारगृहात रवानगी

जळगाव : वडीलांच्या मारेक-यांचा मित्र असलेल्या तरुणाचे अपहरण करुन त्यास जीवे ठार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. याशिवाय एका विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेत त्याची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन व हत्यार जप्त करण्यात आले असून इतर फरार संशयितांचा शोध सुरु आहे. कल्पेश सुनिल पाटील असे अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका झालेल्या तरुणाचे नाव आहे. कृष्णा जिभाऊ झाल्टे (रा. पवारवाडी चाळीसगांव) आणि मेहुल रत्नपाल मोरे (रा. हनुमानवाडी, चाळीसगांव) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की एमबीएचे शिक्षण घेणारा चाळीसगाव येथील तरुण कल्पेश सुनिल पाटील यास दोघा जणांनी 17 जुलै रोजी रात्री आठ वाजता उचलून नेले होते. याबाबत त्याच्या आईने चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला माहिती दिली होती. त्याच रात्री पो.नि. संदिप पाटील यांनी आपल्या सहका-यांसह त्याच्या शोधार्थ पथक रवाना केले होते.  

दरम्यान सटाणा परिसरात अपहरणकर्ते त्यांच्या ताब्यातील एर्टीगा कारमधे पेट्रोल भरण्यासाठी आले होते. त्या संधीचा फायदा घेत अपहृत कल्पेश याने गाडीतून उडी मारुन स्वत:ची सुटका करुन घेत बचावासाठी आरडाओरड केली. याबाबत माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलिसांनी सटाणा पोलिसांसोबत संपर्क साधून मदत मागितली. सटाणा पोलिसांच्या मदतीने अपहृत कल्पेश यास ताब्यात घेण्यात आले. त्याला चाळीसगाव शहर पोलिसांनी आपल्या ताब्यात घेत  चाळीसगावला आणले. त्याची विचारपूस करण्यात आली. दरम्यान अपहरणकर्ते फरार झाले होते.

अपहृत कल्पेशने दिलेल्या माहितीनुसार चाळीसगाव येथील एका विधीसंघर्षित बालकाचे वडील बाळू मोरे यांचे सुमित भोसले आणि संता पहेलवान हे दोघे मारेकरी आहेत. हे दोघे मारेकरी कल्पेशचे मित्र आहेत. या कारणावरुन बाळू मोरे यांच्या विधीसंघर्षीत मुलासह इतर संशयीत आरोपींनी कल्पेशच्या अपहरणाचा कट रचला.

संगनमताने विधीसंघर्षित बालकाने पिस्टलचा धाक दाखवत कल्पेश यास जबरीने सोबत नेले. कल्पेश यास प्रथम मोटर सायकलवर व नंतर इतर साथीदारांसोबत एर्टिगा कारमध्ये  टाकुन बाहेर गावी नेण्यात आले. विधीसंघर्षीत बालकाने कल्पेशला जिवंतच ठेवत नाही असे म्हणत त्याच्याकडील बागायती रुमालाने त्याच्या गळ्याला फास देत जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

इतर अनोळखी संशयितांनी आरोपीतांनी अपहृत कल्पेशच्या रुमाल धरुन ठेवलेल्या दोन्ही हातावर काठ्यांनी व बेल्टने मारहाण केली. सटाणा मार्गे एर्टिगा कारने कल्पेशला नेत असतांना गाडी पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर नेण्यात आली. त्या संधीचा फायदा घेत कल्पेशने कारचा दरवाजा उघडून बाहेर उडी मारुन मदतीसाठी आरडाओरड केली.

त्याची आरडाओरड ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. लोक जमा  झाल्याचे बघून अपहरणकर्ते कल्पेश यास सोडून कारसह पळून गेले होते. अशा प्रकारे कल्पेशने दिलेल्या माहितीनुसार चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला दिनांक 18 जुलै 2024 रोजी गुन्हा रजि.नं. 308/2024 भा.न्या.सं कलम 109, 137(2), 140(1) (2), 142, 60, 61(2) (क), 189(2) (4), 190, 191(3) सह भारतीय हत्यार प्रतिबंधक कायदा कलम 3/25, 29 म.पो.का. कलम 37(1) (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील तपासी अंमलदार पोलिस उप निरीक्षक योगेश माळी, पोहेकॉ विनोद भोई, पोकॉ कल्पेश पवार, पोकॉ अमोल पाटील, पोकॉ रविंद्र बच्छे, पोकॉ. सचिन वाघ आदींनी या गुन्ह्यातील संशयीत आरोपी कृष्णा जिभाऊ झाल्टे, मेहुल रत्नपाल मोरे यांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. तसेच विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेत त्याची रवानगी जळगाव येथे बाल सुधारगृहात करण्यात आली.  

संशयीत आरोपीतांनी गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा (पिस्टल), एक जिवंत काडतुस (राऊंड), मारुती सुझुकी कंपनीची इर्टिगा कार, अपहृत कल्पेश यास गळफास देवुन जिवे मारण्यासाठी वापरलेला बागायती रुमाल आदी वस्तु जप्त करण्यात आल्या आहेत. अटकेतील संशयीत आरोपी न्यायालयीन कोठडीत असून उर्वरीत तिघांचा शोध सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here