व्हिडीओच्या माध्यमातून पकडले गावठी कट्ट्यासह दोघे

जळगाव : गावठी कट्ट्याने फायरिंग करणा-या तरुणाचा बातमीदाराकडून मिळालेल्या व्हिडीओच्या माध्यमातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघा तरुणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून फायरिंग केलेला गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे. तसेच दोघांविरुद्ध अडावद पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्हिडीओ नेमका कोणत्या परिसरातील आहे याचा कुठलाही मागमुस नसतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध लावून कामगिरी केली आहे.

एक तरुण निर्जन स्थळी हातात गावठी कट्टा घेऊन फायरिंग करत असल्याचा व्हिडीओ बाबतची माहिती दिनांक 27 जुलै 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे हे.कॉ. हरिलाल पाटील यांना समजली होती. समाजात दहशत माजवणा-या  व्हिडीओसह त्या तरुणाचा शोध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील श्रेणी पोलिस उप निरीक्षक अनिल जाधव, सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ. हरिलाल पाटील, विष्णु बि-हाडे, हेमंत पाटील, प्रदिप सपकाळे, भारत पाटील, प्रदिप चवरे आदी करत होते.

सखोल तपासाअंती अडावद येथील इंदीरा नगर परिसरातील विशाल राजेंद्र ठाकुर या तरुणाने ती फायरिंग केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्याला शिताफीने ताब्यात घेत  त्याची चौकशी करण्यात आली. उनपदेव गावाकडे जाणा-या शेतातील तो प्रसंग असल्याचे त्याने कबुल केले. संबंधीत गावठी कट्टा विशाल याने त्याचा साथीदार रोहन रविंद्र पाटील (रा.लोणी ता. चोपडा ह.मु. कोनगाव भिंवडी जि.ठाणे) याच्या सोबत खरेदी केल्याचे त्याने कबुल केले.

रोहन पाटील यास ठाणे जिल्ह्याच्या कोनगाव येथून ताब्यात घेण्यात आले. चोपडा तालुक्यातील लोणी येथे लपवून ठेवलेला तो कट्टा हस्तगत करण्यात आला. विशाल ठाकुर आणि रोहन पाटील या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तिस हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि दोन हजार रुपये किमतीचे चार  जिवंत काडतुस जप्त करण्यात आले  आहेत. दोघांविरुध्द अडावद पो.स्टे. ला  गु.र.नं. 124/24 भारतीय हत्यार अधिनियम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अडावद पोलिस स्टेशनचे सपोनि संतोष चव्हाण करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here