जळगाव जिल्ह्याच्या जामनेर येथील राज्यसभेचे माजी खासदार इश्वरलाल जैन तसेच त्यांचा पुत्र मनीष जैन या दोघांसह 21 जणांविरुद्ध ईडीने नागपूर येथील विशेष सत्र न्यायालयात मनी लॉंड्रींगचा खटला दाखल केला आहे. न्या. प्रकाश कदम यांनी या खटल्याची दखल घेत सर्व 21 जणांना 30 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.
ईश्वरलाल जैन यांच्यासह इतरांनी स्टेट बॅंकेतून घेतलेल्या कर्जाची रक्कम थकवून व्याजासह 352 कोटी 49 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सीबीआयने विविध कलमाखाली तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. त्या आधारे ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा तपास करुन हा खटला दाखल केला आहे. जैन पिता पुत्रासह इतरांनी कर्ज मिळवण्यासाठी आर्थिक क्षमतेची बनावट कागदपत्रे सादर करणे, कर्जासाठी गहाण ठेवलेल्या मालमत्तांची बँकेच्या परवानगीशिवाय विक्री करणे, या प्रकरणातील महत्वाचे पुरावे नष्ट करणे, शेल कंपन्यांची स्थापना करणे, बोगस संचालकांची नियुक्ती करणे असे विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे केल्याचे ईडीने केलेल्या तपासात आढळून आले.
जैन पिता पुत्रांसह नितिका मनीष जैन, आर्या जैन, राजेश्वरी जैन, पुष्पादेवी जैन, एन. एस. दोशी, ए. आर. लांडगे, मे. राजमल लखीचंद ज्वेलर्स, मे, मानराज ज्वेलर्स, मे. आर. एल. गोल्ड, मे. राजमल लखीचंद, मे. राजमल लखीचंद अॅण्ड सन्स, मे. आर. एल. इंटरप्रायजेस, मे. मानराज मोटर्स, मे. मानराज ऑटोमोबाईल्स, मे. मनवी होल्डिंग, मे. आर. एल. हॉस्पिटल, मे, मानराज हाऊसिंग फायनान्स व मे. छत्रपती रिअल इस्टेट अॅण्ड प्रोजेक्ट्सचा आदींचा या खटल्यात समावेश आहे. या सर्वांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंध कायद्यातील कलम 3, 34 व 70 नुसार हा खटला दाखल आहे.
दि. 17 ऑगस्ट 2023 रोजी राजमल लखीचंद समुहाच्या जळगावसह नाशिक, ठाणे अशा विविध कार्यालयांसह रहिवासी जागांवर छापे टाकले होते. या छाप्यांमधे 24 कोटी 36 लाख रुपये मुल्यांचे हिरे, सोने –चांदीचे दागिने, 11 कोटी 21 लाखांची रोकड आणि विविध संशयास्पद कागदपत्रे जप्त केली होती. याशिवाय 13 ऑक्टोबर 2023 रोजी 315 कोटी 60 लाख रुपयांची इतर संपती देखील जप्त करण्यात आली होती.