जळगाव : इलेक्ट्रीक मोटार पंप चोरी करणा-या त्रिकुटास चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. अटकेतील त्रिकुटापैकी एकाला त्याच्या मैत्रीणीला एक हजार रुपये द्यायचे होते. त्यामुळे तो या चोरीत सहभागी झाल्याचे त्याने कबुल केले आहे. अटकेतील तिघांविरुध्द रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पो.नि. संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 30 जुलै रोजी त्यांचे सहकारी गस्तीवर कार्यरत होते. पोलिस उप निरीक्षक योगेश माळी, पो.हे.कॉ. रवी पाटील, दीपक पाटील, प्रवीण जाधव, पो.कॉ. अमोल भोसले, गणेश कुवर, गोपाल पाटील असे सर्वजण घाटरोड परिसरात गस्तीवर होते.
दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास त्यांना तिघे इसम मोटार सायकलवर इलेक्ट्रीक मोटार पंप घेऊन जातांना दिसले. त्यांच्या हालचाली बघता पथकाला पथकाला तिघांवर संशय आला. तिघांना ताब्यात घेत त्यांची सखोल चौकशी केली असता इलेक्ट्रीक मोटार पंप चोरीचा गुन्हा उघड झाला. त्यांच्या ताब्यातील चोरीची मोटरपंप व गुन्ह्यात त्यांनी गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल असा 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या तिघांपैकी एकाने त्याच्या काकाच्या शेतातून ही मोटार चोरी केल्याचे कबुल केले. एकाने त्याच्या मैत्रीणीला एक हजार रुपये द्यायचे असल्यामुळे या चोरीत सहभाग घेतल्याचे कबुल केले. आपली मुले बाहेर काय उद्योग करतात? याबाबत पालकांनी लक्ष देण्याची अथवा त्यांची पावले गुन्हेगारीच्या दिशेने प्राथमीक स्वरुपात वळली असल्यास त्यांचे तातडीने समुपदेशन करण्याची गरज पो.नि. संदीप भटू पाटील यांनी व्यक्त केली आहे.