नाशिक : दिवसा घरफोडी करणा-या अट्टल गुन्हेगारास नाशिक ग्रामीण पोलिसांनी नंदुरबार येथून अटक केली आहे. जिमी शर्मा असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि देवळा पोलीस स्टेशनच्या गुन्हेशोध पथकाने नंदुरबार शहरात सतत तीन दिवस व रात्र पाळत ठेवून सराईत गुन्हेगार जिमी बिपीन शर्मा उर्फ अर्मित उर्फ दिपक (रा. गुरूकुल नगर, नंदुरबार) यास अटक करण्यात यश मिळवले आहे. अटकेतील जिमी शर्मा याच्याविरुद्ध धुळे व नंदुरबार जिल्ह्यासह हरियाणा राज्यात गुन्हे दाखल आहेत.
दि. 27 जुन 2024 रोजी दुपारच्या वेळी मालेगाव शहरातील जयहिंद कॉलनी परिसरातील एका बंद घराच्या दरवाजाचे कुलुप तोडून घरफोडी झाली होती. या घरफोडीच्या घटनेतील चोरटयाने घराच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 19 लाख 19 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल घरफोडी करुन चोरी केला होता. या घटनेप्रकरणी मालेगाव कॅंम्प पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर 18 जुलै 2024 रोजी सकाळच्या वेळी देवळा शहरातील ज्ञानेश्वर नगर परिसरातील एका बंद घराचा कडी कोंडा तोडून असाच घरफोडीचा प्रकार घडला होता. या घटनेत चोरट्याने घरातील कॉटमधे ठेवलेले सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 5 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला होता. या घटनेप्रकरणी देवळा पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या दोन्ही घटनांचा तपास सुरु असतांना हे गुन्हे नंदुरबार येथील सराईत गुन्हेगार जिमी बिपीन शर्मा याने केल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. राजु सुर्वे यांच्या लक्षात आले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि देवळा पोलिस स्टेशनच्या संयुक्त पथकाने या तपासकामी सहभाग घेतला. नंदुरबार शहरात पोलिस पथकाने मुक्काम ठोकत सलग तिन दिवस जिमी शर्मावर पाळत ठेवली. त्याला शिताफीने अटक करण्यात आली.
जिमी शर्माने दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली. देवळा पोलिस स्टेशनचे पो.नि. ज्ञानेश्वर जाधव यांनी त्याची सखोल चौकशी व तपास केला असता जिमी शर्मा हा दिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्याच्याविरुद्ध धुळे, नंदुरबार, नाशिक तसेच हरियाणा राज्यात घरफोडीचे विविध गुन्हे दाखल आहेत.
नाशिक ग्रामीण एलसीबीचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे व देवळा पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या पथकातील सपोनि गणेश शिंदे, सपोनि किशोर जोशी, पोउनि दामोधर काळे, पोहवा नवनाथ सानप, सुधाकर बागुल, प्रशांत पाटील, पोना विश्वनाथ काकड, विनोद टिळे, देवळा पो.स्टे. चे पोहवा प्रकाश शिंदे, पोकॉ संदिप चौधरी तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोना हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, भाउसाहेब टिळे, मपोकॉ तृप्ती पवार, प्राजक्ता सोनवणे, पोना कुणाल वैष्णव, शैलेश गांगुर्डे, अमोल गांगुर्डे आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.