जळगाव : माहिती अधिकार कायदा अमलात आणण्यासाठी किसन बाबुराव हजारे अर्थात अण्णा हजारे यांनी आंदोलने केली. अखेर सरकारने माहिती अधिकार कायदा अमलात आणला. या कायद्यामुळे जनतेला शासकीय माहिती मिळणे सोपे झाले. असे असले तरी देखील काही अधिकारी माहिती दडवून ठेवत या कायद्याची कशाप्रकारे वाट लावतात याचे विविध नमुने बघण्यास मिळतात. जळगाव येथे देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांनी या कायद्याची वाट लावल्याचे म्हटले जात आहे.
विविध मुद्द्यावर माहिती अधिकारात मागितलेली माहिती न देता ती दडवून ठेवण्यासह प्रथम अपिलीय अधिका-यांकडे गैर हजर राहिल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालयीन अधिक्षक श्रीधर केशव सुर्वे यांच्याविरुद्ध माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रार अर्ज दिला आहे. जनमाहिती अधिकारी या नात्याने श्रीधर सुर्वे यांनी 30 जानेवारी 2024 पर्यंत तिस दिवसांच्या कालावधीत माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती आरटीआय कार्यकर्ता गुप्ता यांना माहिती देणे बंधनकारक होते. मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून माहिती दडवून ठेवण्याचा प्रकार होत असल्यामुळेच गुप्ता यांनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दिला आहे.
विविध प्रकारच्या मद्य परवानाधारकांची विविध कालावधीतील एकुण सहा मुद्द्यांवर आधारीत माहिती प्राप्त होण्यासाठी आरटीआय कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे 29 डिसेंबर 2023 रोजी रितसर अर्ज केला होता. मात्र नियमानुसार तिस दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतर देखील गुप्ता यांना माहिती मिळाली नाही. तब्बल पन्नास दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर गुप्ता यांना अपुर्ण व असमाधानकारक माहिती देण्यात आली. तसेच काही मुद्द्यांची माहिती मिळवण्यासाठी स्वतंत्र अर्ज देण्याचा सल्ला उत्तरादाखल राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आला.
नियमानुसार माहिती मिळाली नसली तरी देखील गुप्ता यांनी उत्तरात मिळालेल्या माहितीच्या आधारे विविध मुद्द्यावर एकुण नऊ अर्ज नव्याने स्वतंत्रपणे सादर केले. या नऊ अर्जांची माहिती गुप्ता यांना मिळाली नाही. वेळेत नऊ अर्जांची माहिती मिळाली नाही म्हणून दीपककुमार गुप्ता यांनी व्यथीत होत 29 एप्रिल 2024 रोजी प्रथम अपिलीय दाखल केले. या अर्जाबाबत दिनांक 28 मे 2024 रोजी सुनावणी झाली. या सुनावणीचा निकाल 1 जून 2024 रोजी प्रथम अपिलीय अधिकारी डॉ. व्हि.टी. भुकन यांनी दिला. कर्तव्यात कसुर केल्याचा श्रीधर केशव सुर्वे यांच्यावर ठपका ठेवत रितसर माहिती गुप्ता यांना देण्याचे आदेश प्रथमअपिलीय अधिकारी डॉ. भुकन यांनी दिला. तरीदेखील आदेश डावलून सुर्वे यांनी गुप्ता यांना माहिती दिली नाही. त्यामुळे आरटीआय कार्यकर्ता गुप्ता यांनी डॉ. भुकन यांची प्रत्यक्ष भेट घेत आपली व्यथा मांडली. अपिलीय अधिकारी डॉ. भुकन यांनी गुप्ता यांच्यासमक्ष बोलावून त्यांना माहिती देण्याचे आदेश देऊन देखील गुप्ता यांना माहिती मिळाली नाही. त्यामुळे गुप्ता यांनी सविस्तर मुद्दे मांडत जळगाव शहर पोलिस स्टेशनला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालयीन अधिक्षक श्रीधर केशव सुर्वे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होण्याबाबत तक्रार अर्ज दिला आहे.