जळगाव : जळगाव येथील प्रसुती तज्ञ महिला डॉ. तिलोत्तमा गाजरे यांच्याविरुद्ध महिलेच्या मृत्युप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 21 ते 22 जानेवारी 2022 या कालावधीत त्यांच्या पोलिस अधिक्षक कार्यालयासमोरील दवाखान्यात एक महिला प्रसुतीसाठी दाखल झाली होती. प्रसुती दरम्यान व प्रसुती नंतर अति रक्तस्त्रावामुळे त्या महिलेचा मृत्यू झाला होता.
या मृत्यूप्रकरणी मयत महिलेच्या परिवाराने डॉ. तिलोत्तमा गाजरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस दप्तरी तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेत वैद्यकीय समितीच्या समक्ष मतदेहाचे शवविच्छेदन पुर्ण करण्यात आले होते. तसेच या मृत्यूमागचे नेमके कारण तपासण्याकामी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक नेमण्यात आले होते.
या पथकाने दिलेल्या अहवालानुसार डॉ. गाजरे यांच्याविरुद्ध उपचारात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला. वैद्यकीय अहवाल तसेच चौकशीअंती मयत विवाहितेचे पती जयप्रकाश जियालाल विश्वकर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जिल्हापेठ पोलिस स्टेशनला डॉ. तिलोत्तमा गाजरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.