जळगाव : दुचाकी चालकास जबर धडक देऊन त्याच्या मरणास कारणीभूत ठरलेल्या व घटनास्थळावरुन पलायन करणाऱ्या पिकअप वाहन चालकास चाळीसगाव शहर पोलिसांच्या पथकाने फिल्मी स्टाइल पाठलाग करुन अटक केली आहे. रिहान उर्फ अब्बू अली सय्यद अली (रा. नगरदेवळा ता. पाचोरा जि. जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या पिकअप वाहन चालकाचे नाव आहे. घटनास्थळावर जमलेले लोक बेदम मारहाण करतील या भीतीने आपण घटनास्थळावरून पळून गेल्याची कबुली त्याने पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे दिली आहे. दिनांक 2 ऑगस्ट 2024 रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास चाळीसगाव – मालेगाव रस्त्यावरील हॉटेल चंद्रा समोर ही अपघाती मृत्यूची घटना घडली.
या घटनेमधील अनोळखी दुचाकी चालकास पिकअप चालक रिहान याने जबर धडक दिली. या धडकेत दुचाकी चालकाच्या डोक्याला मार लागून तो जागीच ठार झाला होता. घटनेच्या वेळी पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचे परिचित असलेले प्रितेश कटारिया असे दोघेजण हॉटेलमध्ये ग्राहकांच्या रुपात जेवणाची ऑर्डर देऊन प्रतीक्षा करत बसले होते. त्याचवेळी अपघात घडल्यानंतर दुचाकीस धडक देणारा पिकअप वाहनचालक चाळीसगाव शहराच्या दिशेने पळून गेला.
पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत प्रितेश कटारिया यांची सारथीच्या रुपात मदत घेत त्यांच्या कारने संबंधित पिकअप चालकाचा पाठलाग सुरु केला. हॉटेलमधील ग्राहकांनी देखील परिचित तरुणांना फोन करून पलायन करणाऱ्या पिकअप चालकास पकडण्याची सूचना केली. देवळी गावातील तरुणांनी तात्काळ प्रतिसाद देत रस्त्यावर येत पिकअप वाहन पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु पिकअप चालकाने न जुमानता आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने पुढे दामटले. त्यामुळे पिकअप वाहनास अडवता आले नाही.
पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी रात्र गस्तीवरील अंमलदार विश्वास पाटील, अजय पाटील, शरद पाटील, मोहन सूर्यवंशी, गणेश कुंवर, नंदू महाजन आदींना या अपघाताबाबत माहिती देऊन पिकअप वाहन पकडण्यासाठी मालेगाव रोड वरील बिलाखेड बायपासवर तातडीने नाकाबंदी लावण्याचे आदेश दिले.
मालेगाव रोड वरील बेलगंगा साखर कारखान्याजवळ अपघात घडवून दुचाकी चालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारे पिक अप वाहन दिसले. वाहन चालकाला थांबवण्याचा इशारा करुनही तो थांबला नाही. अखेर प्रितेश कटारिया यांनी ओव्हर टेक करुन त्याला थांबण्यास भाग पाडले.
पो.नि. संदीप पाटील यांनी त्यास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले. अखेर त्याने अपघाताची कबुली देत लोक मारतील या भीतीने अपघात स्थळावरून पळ काढल्याचे कबुल केले. संभाव्य परिस्थिती लक्षात घेत पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी त्याला मेहुणबारे पोलीस स्टेशनला आणले.
अपघाताचे साक्षीदार हॉटेल चंद्रा चे मालक राहुल पवार यांच्या तक्रारीवरुन मेहुणबारे पोलीस स्टेशनला पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेतील मयत दुचाकी चालकाची ओळख पटवण्याचे काम सुरु करण्यात आले. पिकअप चालकास पकडण्याकामी मदत करणारे प्रितेश कटारिया तसेच वाहन अडवण्याचा प्रयत्न करणा-या देवळी गावातील ग्रामस्थांचा पोलीस स्टेशन तर्फे लवकरच सत्कार करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिली.