नाशिक : कॅश एक्झिक्युटिव्हच्या ताब्यातील 7 लाख 53 हजार 416 रुपये रोख स्वरुपात हिसकावून पलायन करणा-या टोळीला एमआयडीसी सिन्नर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. या टोळीकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन व रोख रक्कम असा एकुण 7 लाख 79 हजार रुपयांचा मुद्देमाल अटकेतील आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे. लुटून नेण्यात आलेल्या रोकडमधील 7 लाख 53 हजार रुपये आठ जणांनी वाटून घेतले होते.
सागर नंदू चौधरी हे रेडीयंट कॅश मॅनेजमेंट लि. चेन्नई या कंपनीच्या पुणे शाखेमधे कॅश एक्झिक्युटीव्ह या पदावर कार्यरत असून त्यांच्याकडे सिन्नर तालुक्याचे क्षेत्र आहे. सिन्नर शहर व ग्रामीण भागातील मॉल व्यावसायीक या कंपनीकडे त्यांच्याकडील रोकड व चेक विविध बँकामधे झालेल्या करारानुसार जमा करण्यासाठी देतात. 29 जुलै 2024 रोजी या कंपनीचे कॅश एक्झिक्युटीव्ह सागर चौधरी हे त्यांच्याकडे जमा झालेली 7 लाख 53 हजार 416 मुल्याची रोकड त्यांच्या ताब्यातील मोटार सायकलने मोहदरी घाटातून जात होते.
त्यावेळी वाटेत दोन विना क्रमांकाच्या मोटार सायकलवर सहा अनोळखी तरुणांनी त्यांचा पाठलाग केला. मोटार सायकलवर मागच्या सिटवर बसलेल्या तरुणांनी सागर चौधरी यांच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार करुन दुखापत केली. तसेच इतरांनी त्यांच्याकडील हॉकी स्टीकने मारहाण देखील केली. जखमी झालेल्या सागर चौधरी यांच्या ताब्यातील रोख रकमेची बॅग बळजबरी हिसकावून सर्वजण नाशिकच्या दिशेने पळून गेले. या घटनेप्रकरणी एमआयडीसी सिन्नर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. राजु सुर्वे यांच्यासह एमआयडीसी सिन्नर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर व त्यांचे सहकारी या गुन्ह्याचा सखोल तपास करत होते. नाशिक सिन्नर रोडवरील सीसीटीव्ही तपासले असता फिर्यादी चौधरी यांचा पाठलाग करतांना कुणीही आढळून आले नाही. त्यामुळे सागर चौधरी हे नेहमी या रस्त्याने रोकड घेऊन जात असतात याबाबत या लुटारु व हल्लेखोरांना माहिती असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यामुळेच हल्लेखोर लुटारु रस्त्यात अगोदरच दबा धरुन बसले असावे अशी शक्यता वर्तवण्यात आली. त्यानुसार तपासाला दिशा देण्यात आली.
तपासादरम्यान गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा गुन्हा शिंदे पळसे येथील अमोल अरुण ओंढेकर, शुभम विजय पवार या दोघांसह त्यांच्या मित्रांनी केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
या दोघांना ताब्यात घेत त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा त्यांचे साथीदार महेश सतिष पठारे, गौरव प्रभाकर भवर, सागर एकनाथ चव्हाण, प्रसाद आनंदा गायकवाड, गणेश रमेश गायकवाड, सुरज प्रकाश पाकळ अशांच्या मदतीने दोन मोटार सायकल आणि मारुती इर्टीगा कार वापरुन केल्याचे कबुल केले. या गुन्ह्यातील लुटण्यात आलेले 7 लाख 53 हजार रुपये आठ जणांनी वाटून घेतल्याचे त्यांनी कबुल केले. क्रमाक्रमाने इतरांना अटक करण्यात आली.
या गुन्ह्यातील आरोपी महेश सतिश पठारे (रा. विंचुर ता. निफाड) याच्याविरुद्ध लासलगाव पोलीस स्टेशनला आर्म अक्ट व मारहाण असे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. सुरज प्रकाश पाकळ याच्याविरुद्ध अहमदनगर जिल्ह्यात फसवणूक करणे, मारहाण करणे अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशयंत बाविस्कर, पोलीस उपनिरिक्षक किशोर पाटील, पोलीस अंमलदार भगवान शिंदे, योगेश शिंदे, नवनाथ चकोर, प्रकाश उंबरकर, प्रशांत सहाणे, जयेश खाडे तसेच तांत्रिक विश्लेषण विभाग नाशिक ग्रामीण कडील प्रदिप बहीरम, हेमंत गिलबीले आदींनी आपले कौशल्य पणाला लावून हा गुन्हा उघडकीस आणला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील करत आहेत.