नाशिक : दोघा सराईत चंदन तस्करांना नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कन्नड येथून अटक केली आहे. लियाकत अली ख्वाजाअली सैय्यद अली (रा. रिठी, ता. कन्नड) आणि अनिस मोहम्मद शरिफ पठाण (रा. कुंजखेडा, ता. कन्नड) अशी या दोघांची नावे आहेत. अटकेतील दोघांच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे.
दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ओझर पोलीस स्टेशन हद्दीत एअरफोर्स परिसरातील केंद्रीय विद्यालयाच्या आवारातुन अज्ञात आरोपींनी संगनमताने चंदनाचे झाड कापून नेले होते. पंधरा हजार रुपये किमतीच्या या चंदन चोरी प्रकरणी ओझर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु होता.
पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी आपले पथक छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुका परिसरात रवाना केले. या परिसरात सतत तीन दिवस पाळत ठेवून पथकाने लियाकत अली ख्वाजाअली सैय्यद अली आणि अनिस मोहम्मद शरिफ पठाण या दोघांना कन्नड शहरातुन ताब्यात घेतले. सखोल चौकशी आणि ती दोघांनी आपला गुन्हा कबुल केला. अटकेतील दोघेजण चंदन चोरी करणारे सराईत गुन्हेगार आहेत.
अटकेतील दोघांनी दिलेल्या कबुलीनुसार गौसखाँ हनिफ खाँ पठाण (रा. गराडा, ता. कन्नड), फारूख नवाज खान (रा. कुंजखेडा ता. कन्नड), मुजीब पठाण (रा. माउली, ता. कन्नड), फिरोजखान पठाण मेवाती (रा. जंजाळा ता. कन्नड), शाहरूख खान (रा. जंजाळा ता. कन्नड) यांचा देखील या गुन्ह्यात सहभाग असून पोलीस पथक त्यांचा शोध घेत आहेत.
या गुन्ह्याच्या तपासात नाशिक शहरातील अंबड एमआयडीसी व सातपुर परिसरातील चंदन चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. अटकेतील आरोपींविरुध्द छत्रपती संभाजीनगर, पुणे, नंदुरबार जिल्हयांमध्ये चंदन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. गणेश शिंदे, हे.कॉ. नवनाथ सानप, चेतन संवत्सरकर, पोना विश्वनाथ काकड, शरद मोगल, सुभाष चोपडा, नरेंद्र कोळी, योगेश कोळी, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांच्या पथकाने या तपास कामी सहभाग घेतला.