जळगाव : रावेर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मध्यप्रदेशातील सराईत गुन्हेगाराकडून दोन गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुस असा सुमारे 51 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तोफसिंग चतरसिंग बारेला असे गावठी पिस्तुलासह अटक करण्यात आलेल्या मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या तरुणाचे नाव आहे.
रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील पाल ते खरगोन रस्त्यावरील हॉटेल जय पॅलेस समोर एक इसम गावठी देशी बनावटीचे पिस्तुल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या गुन्हे शोध पथकास रवाना केले होते. या ठिकाणी सापळा रचून असून तोफसिंग बारेला यास शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून दोन गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुस असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. डॉ. विशाल जयस्वाल यांच्या पथकातील पोलीस उप निरीक्षक तुषार पाटील, पोहेकॉ रविद्र वंजारी, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे, पोकॉ विकार शेख आदींनी या कारवाईकामी सहभाग घेतला.