जळगाव : यावल तालुक्यात बोगस पिक विम्यांचा सुळसुळाट सुरु असल्याचे एका शेतकरी बांधवाने जिल्हाधिका-यांना दिलेल्या एका पत्रावरुन दिसून येत आहे. आपल्या शेतातील केळी या पिकावर परस्पर पिक विमा काढला जात असल्याचे आणि परस्पर लाभ घेतला जात असल्याचे यावल तालुक्यातील एक नव्हे तर शेकडो शेतक-यांना माहितीच नसल्याचे दिसून येत आहे. शेकडो शेतकरी याबाबत अनभिज्ञ असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढल्यास कोट्यावधी रुपयांचे गैर व्यवहार उघडकीस येणार असल्याचे म्हटले जात आहे.
यावल तालुक्यातील एका शेतकरी बांधवाने त्याच्या शेतात केळीचे पिक कधीही घेतलेले नाही. तरी देखील त्याच्या शेतात केळीचे पिक घेतल्याचे दाखवत त्रयस्थ व्यक्तीने परस्पर केळी पिक विमा घेतल्याचा खोटा दाखल तयार केल्याचे या शेतकरी बांधवाच्या लक्षात आले आहे. या दाखल्याच्या आधारे संबंधीत व्यक्तीच्या बँक खात्यात सत्तर हजार रुपये जमा झाले असल्याचे देखील या शेतक-याच्या लक्षात आले.
या माहितीच्या आधारे संबंधीत शेतक-याने जिल्हाधिका-यांना पत्र देऊन सखोल चौकशीसह कारवाईची मागणी केली आहे. या पत्राचा आधार घेत या बोगस पिक विमा प्रकरणाची चौकशी करुन संबंधीत शेतक-यासह शासनाची फसवणूक करणा-या व लाभ घेणा-या त्या व्यक्तीकडून रकमेची वसुली व योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिका- यांनी कृषी अधिका-यांना दिले आहेत. या बोगस पिक विमा प्रकरणामुळे संपुर्ण यावल तालुक्यातील शेतक-यांमधे खळबळ माजली आहे. अशाच प्रकारच्या शेकडो तक्रारी शासन दरबारी आल्या असल्याचे देखील म्हटले जात आहे.