जळगाव : कोलकाता येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीची कृर लैंगिक अत्याचारानंतर झालेल्या हत्येप्रकरणी निषेध व्यक्त करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने 17 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 6 ते 18 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 6 या 24 तासांच्या कालावधीत नियमित बाह्यरुग्ण तपासणी आणि शस्त्रक्रिया बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तथापी अत्यावश्यक व आपात्कालीन सेवा सुरु ठेवण्याचे देखील कळवण्यात आले आहे.
9 ऑगस्ट 2024 रोजी, आरजी कार मेडिकल कॉलेज, कोलकाता येथे एका तरुण पोस्ट-ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थीनीचा ड्युटीवर असताना तिच्यावर कृरपणे लैंगिक अत्याचार व त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. या भीषण घटनेने वैद्यकीय समुदाय आणि देशाला धक्का बसला आहे. या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी आधीच संप सुरू केला आहे. तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरात आंदोलन आणि निषेध मोर्चे देखील आयोजित केले आहेत.
या गुन्ह्याच्या तपासात कॉलेज प्रशासन आणि पोलिसांचा प्रतिसाद संशयास्पद असल्याचे म्हटले जात आहे. आर जी कार महाविद्यालय प्रशासन व पोलिस प्रशासन यांच्या संगनमताने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप झाल्याने दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी कोलकाता उच्च न्यायालयाने राज्य पोलिसांना या प्रकरणाची जबाबदारी केंद्रीय तपास यंत्रणेला (CBI) हस्तांतरित करण्याचे आदेश दिले.
15 ऑगस्ट 2024 रोजी आरजी कार मेडिकल कॉलेज येथे मोठ्या प्रमाणातील जमावाने तोडफोड केली तसेच आंदोलन करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांवर हल्ला केला. यावेळी जमावाने गुन्हा झालेल्या जागेचीही तोडफोड करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हा घटनाक्रम डॉक्टर विशेषतः महिलांच्या हिंसेच्या वाढत्या धोक्याचा आणि वैद्यकीय सुविधांमध्ये सुरक्षेच्या आवश्यकतेचा संकेत देतो.
या गुन्ह्यातील पीडितांच्या समर्थनार्थ आणि चालू असलेल्या हिंसाचारविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने 17 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 6 ते 18 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 6 पर्यंत 24 तासांच्या सेवा बंदीचा आवाहन केले आहे. या कालावधीत अत्यावश्यक व आपात्कालीन सेवा सुरु राहतील असे देखील मात्र नियमित बाह्यरुग्ण तपासणी आणि शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात येतील असे अध्यक्ष डॉ. सुनिल गाजरे व सचिव डॉ. अनिता भोळे यांनी म्हटले आहे.