जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क): महात्मा गांधींनी त्यांच्या जीवनकाळात मद्यपानाचा निषेध केला. महात्मा गांधीच्या जयंती दिनी 2 ऑक्टोबर रोजी तसेच काही महत्वाच्या सणांसह निवडणूक मत मोजणीच्या दिवशी मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवली जातात. अती मद्यपान शरीराला घातक असते. अती मद्यपानामुळे शरीराची आणि परिवाराची हाणी होते हे सर्वांना समजते. मात्र तरीदेखील मद्य विक्रीमुळे मोठ्या प्रमाणात महसुल मिळतो हे सर्वश्रृत आहे. हा महसुल देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देतो. त्यामुळे कोरोना कालावधीत देखील मद्यविक्री सुरुच ठेवण्यात आली होती.
मद्य महागडे विदेशी असो अथवा स्वस्तातील देशी, ते शरीराला हानीकारकच असते. कुटूंबातील व्यक्तीच्या अती मद्यपानाची सर्वाधीक झळ गोरगरीब कुटूंबाला बसते. कुटूंब प्रमुखाच्या अथवा कुटूंबातील एखाद्या व्यक्तीच्या मद्यपानाच्या घातक सवयीमुळे तळागाळातील कुटूंबाची आर्थिक आणि पारिवारीक हानी मोठ्या प्रमाणात होत असते. मद्य विक्री करणारा नेहमीच आर्थिक सक्षम होत असतो. याउलट मद्य खरेदी आणि प्राशन करणा-याचे मात्र कोणत्या ना कोणत्या रुपाने नुकसानच होत असते. धरणगाव तालुक्यातील सावदे प्र.चा. या गावी मोठ्या भावाने लहान भावाची तो मद्याच्या नशेत असतांना लाकडाने व दगडाने मारुन सार्वजनीक ठिकाणी हत्या केल्याची घटना घडली.
धरणगाव तालुक्यातील सावदे प्र.चा. हे एक लहानसे गाव असून ते गाव पाळधी दुरक्षेत्र हद्दीत येते. या गावी दिपक प्रकाश वाघ आणि इंदल प्रकाश वाघ हे दोघे सख्खे भाऊ एकत्र कुटूंबात रहात होते. इंदल हा खदाण कामगार होता. खदानीत दगड फोडण्याची अवजड कामे केल्यानंतर श्रमपरिहारासाठी त्याला पिण्यास मद्य लागत होते. त्यामुळे काम आटोपून आल्यानंतर त्याची पावले आपोआप मधुशाळेच्या अर्थात दारु अड्ड्याच्या दिशेने वळत होती. मद्यप्राशन करुन घरी आल्यानंतर तो घरात मोठ्या आवाजात बडबड आणि शिवीगाळ करत असे. त्याच्या मोठ्याने बोलण्याचा घरातील सदस्यांना त्रास होत असे.
त्याच्या दारु पिण्याच्या त्रासाला वैतागून त्याची पत्नी माहेरी निघून गेली. पाच महिन्यांचा कालावधी उलटला तरी देखील इंदलची पत्नी त्याच्याकडे येत नव्हती. सोबतीला पत्नी नसल्यामुळे वैतागलेला इंदल विचीत्र वागण्यासह मोठ्या प्रमाणात मद्य प्राशन करु लागला. त्याचा त्रास घरातील सर्वच सदस्यांना होण्यास सुरुवात झाली.
10 ऑगस्ट 2024 रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास इंदल हा नेहमीप्रमाणे मद्यप्राशन करुनच घरी आला. आई कोकीळाबाईकडे त्याने दिलेले मजुरीचे पंधराशे रुपये तो दारु पिण्यासाठी परत मागू लागला. इंदल मद्याच्या मोठ्या प्रमाणात आहारी गेल्यामुळे त्याच्या आईने त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेला इंदल घरातील सर्वच सदस्यांना शिवीगाळ करु लागला. त्याने बळजबरी त्याच्या आईकडील पंधराशे रुपये घेत त्याच्या पॅंटच्या खिशात ठेवून घेतले. त्यानंतर तो भल्या मोठ्या आवाजात मोबाईलवर गाणे ऐकू लागला.
त्याच्या मोठ्या आवाजातील मोबाईलवर गाणे ऐकण्याचा घरातील दिपकच्या लहान मुलीला होऊ लागला. त्या आवाजाने ती झोपेतून उठून जोरजोरात रडू लागली. अगोदरच मोबाईलचा मोठा आवाज त्यात झोपेतून उठलेल्या लहान मुलीचा रडण्याचा आवाज ऐकून घरातील वातावरण ऐन रात्रप्रहरी बिघडले. संतापाच्या भरात इंदलचा भाऊ दिपकने त्याला धक्काबुक्की केली. राग अनावर झाल्याने दिपकने इंदल यास जोरात धक्का दिला. त्यामुळे इंदल घराच्या दरवाजावर ढकलला गेला. त्यामुळे इंदलच्या डोक्याला मार लागून जखम झाली व रक्तस्त्राव होण्यास सुरुवात झाली.
जखमी अवस्थेतील इंदल दिपकची सर्वांना शिवीगाळ सुरुच होती. रागाच्या भरात जखमी इंदल घराबाहेर पडला. त्याच्या मागेमागे त्याचा भाऊ दिपक हा देखील जाण्यास निघाला. चालत चालत मद्याच्या नशेतील इंदल गावाबाहेर बस स्थानक परिसरात आला. त्याच्या मागेमागे संतापलेला त्याचा भाऊ दिपक होताच. संतापाच्या भरात दिपकने बस स्थानक परिसरात असलेल्या सिमेंटच्या बाकाजवळ असलेल्या बैलगाडीच्या लाकडी शिंगाड्याने व दगडाने इंदलच्या डोक्यावर हल्ला केला. इंदलच्या कानावर आणि डोक्याला या हल्ल्यात मोठी दुखापत झाली. दारु पिल्यामुळे अगोदरच त्राण नसलेला इंदल या हल्ल्यामुळे जखमी होत जमीनीवर कोसळला आणि मरण पावला. त्यानंतर हल्लेखोर दिपक एकटाच घरी निघून आला.
सकाळी चार वाजेच्या सुमारास इंदल जखमी आणि मरणावस्थेत पडून असल्याचे काही गावक-यांनी पाहिले. या घटनेची माहिती पोलिस पाटील पवार यांना समजली. पोलिस पाटील पवार यांनी या घटनेची माहिती धरणगाव पोलिस स्टेशनला कळवली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक पवन देसले, पाळधी दुरक्षेत्रचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कंडारे, हे.कॉ. वसंत निकम, प्रदीप सोनवणे, मोहन पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपासाला सुरुवात केली.
अधिक तपास व चौकशीअंती मयत इंदल यास दारुचे व्यसन मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती पुढे आली. तपासा दरन्यान मयत इंदलचा भाऊ दिपक याच्यावर संशयाची सुई फिरु लागली. चौकशीकामी त्याला पोलिस स्टेशनला बोलावण्यात आले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. मात्र पोलिस निरीक्षक पवन देसले आणि सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्यापुढे त्याचा निभाव लागला नाही. त्याने आपला गुन्हा कबुल केला. 12 ऑगस्ट रोजी त्याला अटक करण्यात आली.
या प्रकरणी गोपाल प्रकाश वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीत दिपक प्रकाश वाघ याच्याविरुद्ध धरणगाव पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भाग 5 गु.र.न. 321/24 भारतीय न्याय संहीता कायदा कलम 103, 115 (2), नुसार हा गुन्हा नोंद करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कंडारे व त्यांचे सहकारी करत आहेत.