मुख्यमंत्रीपदाचा चेहरा   

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक घोषणा दिवाळीनंतर होणार हे ठरले. तत्पुर्वी जम्मू काश्मीर हरयाणांचा बिगुल वाजला. महाराष्ट्राची सत्ता काबीज करण्यासाठी महायुती मविआ नेते फिल्डींग लावून बसले आहेतच. आता  महायुतीला घरी पाठवून मविआची सत्ता येणारच या नॅरेटीव्हने जोर धरल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जोश भरला. आता सत्ता येणारचम्हटल्यावर मुख्यमंत्री पदावर दावा ठोकण्यात उद्धव ठाकरे यांनी आघाडी घेतली.

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आताच घोषीत करा असे त्यांनी घटक पक्षांना बजावले. “ज्याच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री” हा फॉर्म्युला त्यांनी धुडकावला. “हा फॉर्म्युला म्हणजे पाडापाडीचा खेळ” तो आता नको असे बजावले. सन 2019 च्या मविआच्या रचनेत उत्साहाने धावाधाव करणारे संजय राऊत हे आताही उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी धावाधाव करताहेत.  मात्र कॉंग्रेस आणि रा.कॉ. वरिष्ठ नेते हुकुमाचा पत्ता गुलदस्त्यात ठेऊन आहेत.

लोकसभा निवडणूकीत राज्यातील मुस्लिम मत गठ्ठा ठाकरेंच्या शिवसेनेकडे वळला आणि ठाकरेंमुळेच कॉंग्रेस आणि रा.कॉ. ला सत्ता मिळाली असे आता  सांगण्यात येत आहे. हिंदुत्वाच्याही गप्पा आणि वाख्यांचा किस पाडून झाला. भाजप नेते अमित शहा पक्षफोडी यशस्वी करणा-या फडणविसांची मर्दुमकी गाजली. अजित पवारांना सत्तेत घेतल्याने भाजपाची पिछेहाट झाल्याचे सांगून झाले. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात हे कारणीभूत घटक हटवण्याचे डावपेच झाले. राजकारणी मंडळी मतलबी अजेंडा कसा  राबवते हे सर्वशृत आहे. युज अ‍ॅंड  थ्रो देखील जनतेने पाहिले.

आता मात्र पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेह-याची जोरदार चर्चा आहे. महायुतीत भाजपाच्या फडणविसांच्या चेह-याला पसंती दिसते. महाराष्ट्रात फडणविसांना मुख्यमंत्री करावे असे  आरएसएस आणि भाजपला वाटत असले तरी दिल्ली हायकमांडचे वेगळे मत दिसते. फडणविसांना पक्षाध्यक्षपदावर बसवून दिल्लीत पाठवतील अशाही वावटळी उठल्या. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवणे ही राजकीय पक्षांची त्यांच्या सोयीची उठाठेव आहे. मविआत सध्या गाजवले जाणारे नाव महाविकासचे प्रचार प्रमुखही आहेत. त्यामुले कॉंग्रेस – रा.कॉ. घटक पक्षातील काही जणांच्या पोटात गोळा उठल्याचे बोलले जाते.

महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात मतप्रवाह आणि चलनी नोटांची मनी पॉवर महत्वाची मानली जाते. त्यापैकी इलेक्टोरल बॉंडसद्वारे पक्षनिधी कसा  जमवला जातो ते देशाने पाहिले. परंतु महाराष्ट्रात काही थोर  पक्षनेते हे केवळ मसल पॉवरने फक्त दांडगा धनसंचय करण्यासाठी सुप्रसिद्ध असल्याचा गगनभेदी गौप्यस्फोट मध्यंतरी मुंबईच्या जेष्ठ पत्रकाराने केलाय. सध्याचे सीएम एकनाथ शिंदे यांनी त्यांची “देणारा” मुख्यमंत्री म्हणून प्रतिमा निर्माण केली. लाडकी बहीण योजना म्हणून 45  हजार कोटी देण्याचा त्यांचा कार्यक्रम वादग्रस्त बनला तरी गाजतोय.

शिंदे प्रकरण थोड बाजूला ठेऊया. महाराष्ट्राच्या आजवरच्या प्रत्येक मुख्यमंत्र्याने मतदारांना आजवर काय दिले? हे ही लोकांसमोर आणा. 11 ते 13 कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात लोकांना काय मिळाले यापेक्षा आजवरचे मंत्री – आमदार सत्तेत ताट तिजोरी त्यांच्याच घराण्यात खेचून नेत राहिलेत. पक्षनिष्ठेचे कुणालाच काही सोयरसुतक नाही. सत्तेसाठी घटनादत्त संविधान पायदळी तुडवून कशी बेधुंद सत्ता मिळवता येते त्याचा नवा  वस्तुपाठच महाराष्ट्राने देशापुढे ठेवला. कधी कधी वाजपेयींनी सांगितलेला राजधर्म केव्हाच कोळून प्यायले असे लोक बोलत. 

धर्म ही अफूची गोळी हेही विसरले. आता बहुदा अफू, गांजा, दारुत धर्म मिसळून नवे  कॉकटेल वाटपाचा कार्यक्रम दिसतो. लोक म्हणतात “सर्वच खोटारडे आहेत”. सगळे मतलबी. त्यांना त्यांची मुले, नातवंडे, नातेवाईकांसाठी सत्ता हवी. त्यासाठी बरेच सुपारीबाज, ठेकेदार, दलाल, हाकारे, पुकारे बोंबले कामास लावले. रेवड्या वाटप सुरु आहे. पुर्वी राजेशाहीत जनतेला लुटून राजे सोन्याची सिंहासने, शे दोनशे राण्या, जनानखाने, दिवाणखान्यात मद्यधुंद मैफीली, पंच पक्वान्ने (56 भोग) असे जगत. जनतेची आठवण आलीच तर हत्तीवरुन रेवड्या फेकल्या जात. राजदरबारातील गाद्या सतरंज्या उचलणारे तेव्हाही होतेच. आताही आहेतच. काय मंडळी? शेवटी एक गाणे आठवा, “एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते है लोग” आता  मतदारांना नेमका कोणता चेहरा हवा? हस-या मुखवट्याच्या आड कृर चेहरा लपवला जातो असेही म्हणतात. काही नेत्यांना महाराष्ट्रातल्या म्हणी, उखाणे भलतेच प्रिय. चांगली गोष्ट. “दिसते तसे  नसते म्हणून जग फसते” हे ही कोण लक्षात घेणार?    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here