जळगाव : मारवड पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यासाठी गेलेले अमळनेर तालुक्यातील एकलहरे येथील रहिवासी, निवृत्त सैनिक फत्तेलाल अर्जुन पाटील यांच्यासह सहा जणांना पोलिस स्टेशनला ठाण्यात डांबून ठेवणे व गुन्हा दाखल करण्यासाठी एक लाख रुपये मागितल्याप्रकरणी तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक व दोन हवालदारांविरुद्ध मारवड पोलिस स्टेशनला न्यायालयीन आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन 2013 मधील या प्रकरणात शनिवारी रात्री हा गुन्हा दाखल झाला आहे.
अमळनेर तालुक्यातील एकलहरे येथील रहिवासी फत्तेलाल पाटील यांना गावातील एका जणाने शिवीगाळ करत त्यांच्या सोबत वाद घातला होता. या घटने प्रकरणी ल्याने संबंधितांविरुद्ध फिर्याद देण्यासाठी फत्तेलाल पाटील हे अन्य पाच जणांसह 29 एप्रिल 2023 रोजी मारवड पोलिस स्टेशनला गेले होते. त्यांची फिर्याद न घेता सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांना पोलिस स्टेशन मधील एका खोलीत डांबून ठेवण्यात आले होते.
तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे, सकाळपासून रात्रीपर्यंत वेगवेगळ्ळ्या शिफ्टमध्ये ड्युटीवर आलेले अंमलदार भरत ईशी, पोहेकॉ रेखा ईशी, पोलिस उपनिरीक्षक किशोर पाटील यांनी फिर्याद न घेता, उलट समोरील व्यक्तीला बोलवून त्याच्याकडून फिर्याद घेत आलेल्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तसेच फत्तेलाल पाटील यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा पाटील यांचा आरोप आहे.
समोरील व्यक्तीच्या फिर्यादीवरून फत्तेलाल पाटील यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. जामीन मिळाल्यानंतर फत्तेलाल पाटील यांनी याबाबत पोलिस अधीक्षक, पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. याबाबत चौकशी पूर्ण झाली, मात्र कारवाई झाली नाही.
त्यामुळे फत्तेलाल पाटील यांनी अमळनेर न्यायालयात धाव घेत दाद मागितली. न्यायालयाने संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे, पोलिस उपनिरीक्षक किशोर पाटील, पोहेकॉ भरत ईशी, पोहेकॉ रेखा ईशी यांच्याविरुद्ध भादंवि कलम 341, 384, 385, 323, 464, 120(ब), 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.