दोन लाख रूपयांची लाच घेणाऱ्या महिला शिक्षणाधिका-यास पकडले रंगेहाथ

धुळे : दोन लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या धुळे जिल्हा परिषदेच्या महिला शिक्षणाधिकाऱ्यास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. श्रीमती मीनाक्षी भाऊराव गिरी असे या लाचखोर महिला (माध्यमिक) शिक्षणाधिका-याचे नाव आहे. श्रीमती मीनाक्षी गिरी यांच्या विरुद्ध धुळे शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या लाच प्रकरणातील तकारदार व त्यांची पत्नी असे दोघे जण  धुळे महानगरपालिका हायस्कुल येथे विशेष शिक्षक पदावर कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व किडा विभागाच्या दि. 30 नोव्हेंबर 2023 च्या शासन निर्णयान्वये त्यांचे एप्रिल 2022 ते ऑक्टोंबर 2023 या कालावधीतील थकीत वेतन तसेच सातव्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा हप्ता मंजुर झाला होता. शिक्षण संचालक, पुणे यांनी त्यांचे थकीत वेतन अधिक्षक (माध्यमिक), वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालय, धुळे यांच्या खात्यात जमा केले होते. परंतु सदरचे थकीत वेतन तक्रारदार व त्यांच्या पत्नीस अदा न झाल्याने त्यांनी वेळोवेळी श्रीमती मिनाक्षी गिरी यांची त्यांच्या कार्यालयात जावुन भेट घेत विनंती केली होती. 

परंतु त्यांनी  विविध कारणे पुढे करत तक्रारदार व त्यांच्या पत्नीस त्यांचे थकीत वेतन अदा केले नाही. त्यांनतर सुमारे वीस दिवसापुर्वी तक्रारदार यांनी श्रीमती मिनाक्षी गिरी यांची त्यांच्या कार्यालयात जावुन त्यांना थकीत वेतन अदा करण्याबाबत विनंती केली. मात्र श्रीमती गिरी यांनी या कामाच्या मोबदल्यात दोन लाख रुपयांची तक्रारदाराकडे लाच मागितली. तक्रारदार यांनी याबाबत धुळे एसीबी कार्यालयाकडे लेखी तक्रार दिली. धुळे एसीबी पथकाने या तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी केली असता त्यात तथ्य आढळून आले. 

लाचेची रक्कम स्विकारण्याचे श्रीमती गिरी यांनी मान्य केल्याने त्यांच्यावर सापळा लावला असता लाचेची रक्कम कार्यालयात स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या विरुध्द धुळे शहर पो. स्टे. येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, प्रविण पाटील, प्रविण मोरे, मकरंद पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here