जळगाव : जळगाव जिल्ह्यातून नेपाळच्या काठमांडू येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरातील अनेक भाविक आहेत. उत्तर प्रदेशातील ही खासगी बस खोल नदीत कोसळून बसमधील सुमारे 14 भाविकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून 16 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
प्रचंड वेगाने वाहणाऱ्या नेपाळमधील नदीत काही भाविक वाहून गेले असून त्यांचा शोध अद्याप लागला नसून त्यांचा शोध सुरु आहे. अपघातग्रस्त बस मधील सर्व भाविक भुसावळ तालुक्यातील वरणगाव- तळवेल व परिसरातील आहेत. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोखराहून काठमांडूकडे जाताना बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस नदीत कोसळली.
नेपाळमधील तनहुन जिल्ह्यात शुक्रवार 23 ऑगस्टच्या सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. बस नेपाळच्या प्रमुख महामार्गावरील मर्त्यांगडी नदीत कोसळली. नेपाळची राजधानी काठमांडूपासून 120 किलोमीटर अंतरावरील पश्चिमेकडे अबुखैरेनी गावा नजीक हा अपघात घडला. नेपाळमधील जवानांचे मदत पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. काही भाविकांना वाचवण्यात यश आले असून बेपत्ता भाविकांचे शोधकार्य सुरु आहे.
अपघातग्रस्त बस गोरखपूरच्या केसरवाणी टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सीची (युपी 53 एफटी 7623) होती. गोरखपूरच्या धर्मशाला बाजार भागातील रहिवासी सौरभ केसरवानी यांची पत्नी शालिनी केसरवानी यांच्या नावावर या बसची नोंदणी आहे. महाराष्ट्रातील कित्येक भाविकांनी चार महिन्यांपूर्वी नेपाळला जाण्यासाठी केसरवाणी ट्रॅव्हल्सच्या तीन बसेस बुक केल्या होत्या. सुमारे 110 लोकांना घेऊन तीन बस प्रवासासाठी रवाना झाल्या होत्या. यापैकी जळगाव जिल्ह्यातील सुमारे 50 भाविक दोन बसमधून प्रवास करत होते. तिसरी बस नेपाळमधील स्थानिक भक्तांसाठी होती असे म्हटले जात आहे. या दुर्दैवी घटनेत बसचा चालक आणि वाहक दोघेही मृत्युमुखी पडले आहेत. दुसऱ्या बसमध्ये प्रवास करणारे लोक नेपाळमधील मुंगलिंगमध्ये रहात असल्याचे सांगितले जात आहे.