जळगाव, दि. २३ (प्रतिनिधी) – बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे चौधरी वाड्यात बहिणाई स्मृती संग्रहालय येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची शनिवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता १४४ वी जयंती साजरी होत आहे. या कार्यक्रमासाठी खामगाव जि. बुलडाणा येथील साहित्यिक प्रा. देवबा शिवाजी पाटील, चाळीसगावच्या सौ. कामिनी अमृतकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याच प्रमाणे ट्रस्टच्या विश्वस्त सौ. ज्योती अशोक जैन, बहिणाईंच्या नातसून पद्माबाई, पणतसून श्रीमती स्मिताताई, विश्वस्त दीनानाथ चौधरी, समस्त चौधरी परिवार, साहित्यिक, गांधी रिसर्च फाऊंडेशन येथील विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास येण्याचे करावे असे आवाहन आयोजकांतर्फे केले आहे.
कान्हदेशातील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे साहित्य क्षेत्रात सन्मानाचे स्थान आहे. बहिणाबाईंच्या जात्यावरच्या ओव्या, काव्यातील साधेपणा, सोपी अन् हृदयाला भिडणारी भाषा, भावनांमध्ये प्रांजळपणा, शब्दाआड रुजलेला माणूसकीचा ओलावा, निसर्ग, पशु-पक्षी, शेती माती आणि कष्टांवर अतुट प्रेमामुळे त्यांच्या कविता अगदी सहजरीत्या बालपणापासूनच घराघरात पाठ्यपुस्तकांद्वारे, गाण्याच्या माध्यमातून पोहोचली.
प्रमुख पाहुणे प्रा. देवबा शिवाजी पाटील, खामगाव, जि. बुलढाणा, सुप्रसिद्ध साहित्यिक, आजपर्यंत एकूण ५९ पुस्तके प्रकाशित, विषय – धार्मिक स्तोत्रे, संत साहित्य, काव्यसंग्रह, देशभक्ती, विज्ञान, निसर्ग, कथासंग्रह, शैक्षणिक, युवांसाठी लेखसंग्रह, सामाजिक वैचारिक लेखसंग्रह, शालोपयोगी साहित्य, बालकुमार कादंबरी, कथासंग्रह इ. असून अनेक मानाचे (६) साहित्यिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यात विशेष सन्मान म्हणजे साहित्य अकादमीच्या मराठी भाषेच्या बालसाहित्य पुरस्कार सल्लागार समितीचे ते सदस्य होते. त्यांच्या ग्रंथावर समीक्षा ग्रंथ ही प्रकाशित झाली आहेत तसेच त्यांच्या काव्यसंग्रहांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. ते साहित्य कुंज या नियतकालिकाचे संपादक आहेत. साहित्य कुंज या संस्थेचे संस्थापक असून त्यांनी अनेक काव्य-लेख-कथा स्पर्धांचे व विद्यार्थी साहित्य मेळाव्यांचे आयोजन केले आहे. ते खामगाव येथे उन्मेष नावाचे वाचनालय ही चालवितात. प्रमुख पाहुण्यांसोबत चाळीसगाव येथील आकाशवाणी कलावंत, लेखिका, निवेदक सौ. कामिनी सुनिल अमृतकर या देखील उपस्थित असतील. या प्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यावर प्रकाशित पुस्तकांचे प्रदर्शन “माह्यी माय सरसोती!” याचे ही आयोजन केले आहे. सर्वांनी लाभ घ्यावा असे ट्रस्टतर्फे समन्वयक अशोक चौधरी यांनी आवाहन केले आहे.