जळगाव : यावल तालुक्यातील चिंचोली येथील दुकानदाराकडून पन्नास हजार रुपयांची खंडणी घेतल्यानंतर पुन्हा दोन लाख रुपयांची खंडणी मागणा-या अन्न –औषधी खात्याच्या दोघा तोतया अधिका-यांना अटक करण्यात आली आहे. आकाश भगवान जावरे (रा. आंबेडकर चौक, नंदुरबार) व राहुल श्रीहरी काळे (रा. कात्रज, पुणे) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. त्यांच्या मुख्य सुत्रधाराचा शोध सुरु आहे.
चिंचोली ता. यावल येथील संतोष हरी बडगुजर हे किराणा दुकानदार आहेत. 7 जुलै रोजी दोघे तोतया अधिकारी संतोष बडगुजर यांच्या दुकानात आले. तुम्ही विमल गुटखा विकतात, तुमच्याविरुद्ध कारवाई करायची असून तुमच्या पत्नी व मुलांना अटक करायची आहे असे धमकावत दोघांनी बडगुजर यांच्याकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. यावेळी पन्नास हजाराची खंडणी उकळल्यानंतर दोघे निघून गेले.
त्यानंतर 30 ऑगस्ट रोजी पुन्हा दोघांनी बडगुजर यांच्याकडे अधिक रकमेची मागणी केली. मात्र यावेळी बडगुजर यांनी पोलिस स्टेशनला धाव घेत तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरुन दोघांना अटक करण्यात आली. अटकेतील दोघांची पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर केले असता दोघांना पुन्हा 5 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.