जळगाव : जळगाव शहरातील भास्कर मार्केट परिसरातील हॉटेल शालीमार येथे 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास गोळीबारीची घटना घडली होती. या घटनेतील मुख्य आरोपी भुषण रघुनाथ सपकाळे हा असल्याचे निष्पन्न झाले होते. भुषण सपकाळे हा तडीपार गुंड असून देखील तो शहरात वावरत होता. तो आपल्या साथीदारांसह हॉटेल शालीमार येथे मद्यपान करण्यासाठी आला होता.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी भुषण सपकाळे याच्यासह त्याचे इतर साथीदार आरोपी तपासाअंती निष्पन्न झाले आहेत. भुषण रघुनाथ सपकाळे (रा.खेडी बु.ता.जि. जळगांव), गोकुळ उर्फ गोट्या सुरेश कोळी (रा. नांदेड साळवा, ता. धरणगांव, जि. जळगांव), सचिन राजेंद्र जगताप (रा. शाहु नगर, दत्त कॉलनी, भोलेनाथ मंदीरा जवळ, जळगांव, यशवंत उर्फ मयुर राजेंद्र सोनार (रा. प्लॉट नं. 14 दिनकर नगर, आसोदा रोड, जळगांव), राज उर्फ पप्पु सौनार, अविनाश महाजन, आबा कोळी व इतर दोन अनोळखी इसम असे सर्वजण निष्पन्न झाले आहेत.
भर रहदारीच्या रस्त्यावरील हॉटेलमधे अचानक गोळीबार झाल्याने घटनेच्या वेळी भयाचे वातावरण पसरले होते. इतर ग्राहकांसह गोळीबार घटनेतील सर्वजण देखील धुम ठोकून पळून गेले होते. या घटनेप्रकरणी पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत आदींनी गांभिर्याने दखल घेत घटनेचा तपास तातडीने सुरु करण्याचे संबंधीतांना आदेश दिले होते.
या घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गु.र.नं. 283/2024 आर्म अॅक्ट कलम 3/25, 3/27 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करत होती. या गुन्ह्याच्या तपासात हॉटेल शालीमार मधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे भुषण रघुनाथ सपकाळे याच्यासह इतर नऊ आरोपी निष्पन्न करण्यात आले.
आरोपींच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, हे.कॉ. सुधाकर अंभोरे, हे.कॉ. जितेंद्र पाटील, हरीभाऊ पाटील, इश्वर पाटील आदींचे एक पथक तयार करण्यात आले होते. जिल्हापेठचे पो. नि. राकेश मानगावकर यांच्या पथकातील पो.उप. निरीक्षक शांताराम देशमुख, पोहेकॉ. सलिम तडवी, पोकों, मिलींद सोनवणे, पोकॉ. विशाल साळुंखे, पोकॉ. नरेंद्र दिवेकर, अमितकुमार मराठे आदींचे दुसरे पथक तयार करण्यात आले होते.
दोन्ही पथकाने केलेल्या एकत्रीत कामगिरीचे फलीत म्हणून आरोपी भुषण रघुनाथ सपकाळे, गोकुळ उर्फ गोट्या सुरेश कोळी, सचिन राजेंद्र जगताप, यशवंत उर्फ मयुर राजेंद्र सोनार अशा चौघांना दिनांक 28 ऑगस्ट रोजी ताब्यात घेत अटक करण्यात आली. अटकेतील सर्वांची 30 ऑगस्ट 2024 पर्यंत पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली होती.
पोलीस कोठडी कालावधीत आरोपी गोकुळ उर्फ गोट्या सुरेश कोळी याच्याकडून गुन्हयात वापरलेला गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे. अटकेतील चौघेजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक जिल्हापेठचे पोलीस निरीक्षक अनिल मोरे करत आहेत.