जळगाव :तिस लाख रुपयांच्या मोहात पडून महिलेचा तिच्याच स्कार्फने गळा दाबून खून करणा-या दोघा संशयीतांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अथक परिश्रम व तपासाअंती अटक करण्यात यश मिळवले आहे. महिलेचा खून केल्यानंतर दोघा संशयीत मारेक-यांनी तिचा मृतदेह नदीत फेकून दिला असून तो मृतदेह अद्याप सापडलेला नाही. स्नेहलता संजय चुबळे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तसेच जिजाबराव अभिमन्यु पाटील आणि विजय रंगराव निकम असे दोघा संशयीत मारेक-यांचे नाव आहे.
जिजाबराव अभिमन्यु पाटील हा जिल्हा परिषदेच्या धरणगाव तालुक्याच्या साळवा येथील प्राथमीक आरोग्य केंद्रात लिपीक म्हणून कार्यरत असून लिपीक संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे. विजय रंगराव निकम हा जिल्हा परिषदेच्या अमळनेर बांधकाम विभागात लिपीक म्हणून कार्यरत आहे. तो जिल्हा परिषद लिपीक संघटनेचा उपाध्यक्ष आहे.
या घटनेतील मयत महिला स्नेहलता संजय चुबळे ही जिल्हा परिषदेची सेवानिवृत्त कर्मचारी होती. त्यामुळे तिची या दोघांसोबत ओळख होती. तिघे जिल्हा परिषद कर्मचारी असल्यामुळे तिघे एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखत होते. त्यामुळे स्नेहलता चुबळे या महिलेचा दोघांवर विश्वास होता. या विश्वासानेच घात झाला आणि खूनाची घटना घडली.
20 ऑगस्ट 2024 रोजी स्नेहलता चुबळे ही महिला जळगाव शहरातील रिंगरोड स्थित स्टेट बॅंकेत तिच्या 30 लाख रुपयांच्या ठेवीची रक्कम घेण्यासाठी गेली होती. त्यानंतर तीला आपल्या मुलाकडे नाशिक येथे जायचे होते. मात्र त्यानंतर ती बेपत्ता झाली. त्यामुळे या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला मिसींग दाखल करण्यात आली होती.
मिसिंग दाखल होवून दहा दिवसांचा कालावधी उलटला तरी स्नेहलता यांचा तपास लागत नव्हता. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेत हा घातपाताचा प्रकार असल्याची शंका व्यक्त केली. हा प्रकार गंभीर असल्याचे लक्षात येताच डॉ. रेड्डी यांनी तातडीने स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बबन आव्हाड यांना समांतर तपासाचे आदेश दिले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या अनुभवी आणि माहितगार कर्मचा-यांचे एक पथक तयार करण्यात आले. या पथकात सहायक फौजदार विजयसिंग पाटील, हे.कॉ. सुधाकर अंभोरे, हे.कॉ. जितेंद्र पाटील, अकरम शेख, महेश महाजन, लक्ष्मण पाटील, पोलिस नाईक राहुल पाटील, भारत पाटील आदींचा समावेश करण्यात आला. या पथकाने कसून तपास सुरु केला. तपासाअंती जिजाबराव अभिमन्यु पाटील व विजय रंगराव निकम या दोघा संशयीतांची नावे पुढे आली. त्यामुळे दोघांना ताब्यात घेत त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबुल केला.
मिसिंग मधील महिला स्नेहलता संजय चुबळे यांना सेवानिवृत्तीनंतर नाशिक येथे फ्लॅट घ्यायचा होता. त्यासाठी त्या जळगाव येथे बॅंकेतील तिस लाख रुपयांच्या ठेवीची रक्कम काढण्यासाठी आल्या होत्या. या गोष्टी जिजाबराव पाटील आणि विजय निकम या दोघांना चांगल्याप्रकारे माहिती होत्या. त्यामुळे नाशिक येथे 28 लाख रुपयांमधे फ्लॅट घेऊन देतो अशा दोघांनी स्नेहलता चुबळे यांना भुलथापा मारल्या. बॅंकेतील रक्कम ताब्यात घेतल्यानंतर दोघांनी चुबळे यांना त्यांच्या ताब्यातील हुन्डाई कंपनीच्या क्रेटा गाडीत बसवले.
वाटेत स्नेहलता यांचा त्यांच्याच गळ्यातील स्कार्फने गळा आवळून त्यांना जीवे ठार करण्यात आले. त्यानंतर मृतदेह प्लॅस्टीकच्या गोणीत टाकून शिरपुर नजीक तापी नदीत टाकल्याचे दोघे जण पोलिसांना सांगत आहेत. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला गु.र.न. 312/24 भारतीय न्याय संहिता कलम 103 (1), 61(2), 238, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. बेपत्ता मयत स्नेहलता चुबळे यांचा मृतदेह नदीतून शोधण्यासाठी गेल्या तिन दिवसांपसून शिरपुर, नरडाणा, सांरगखेडा, शहादा, प्रकाशा, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात शोध घेण्याचे काम सुरु आहे.