जळगाव : शेतातील विज खांबावर असलेल्या तारांची चोरी करणा-या टोळीस जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या टोळीकडून यावल, रावेर तालुक्यातील विज तार चोरीचे एकुण 44 गुन्हे उघडकीस आले असून लाखो रुपये किमतीच्या तारांसह गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त करण्यात आली आहे.
यावल, फैजपूर आणि रावेर परिसरातील शेतात असलेल्या विजेच्या खांबांवरील तारा चोरी होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. या बाबत शेतकरी बांधवांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गांभिर्याने दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हे उघडकीस आणण्याकामी निर्देश दिले होते. त्याअनुशंगाने तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेतील मेरीटवरील सक्रीय कर्मचा-यांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक राहुल तायडे, गणेश वाघमारे, हे.कॉ. नितीन बाविस्कर, महेश महाजन, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, ईश्वर पाटील, बबन पाटील, प्रदिप सपकाळे, प्रमोद ठाकुर आदींचा या पथकात समावेश करण्यात आला.
तपासाअंती हे गुन्हे मध्य प्रदेशच्या बुरहाणपुर जिल्ह्यातील नुरा मोरे, अनिल भेरसिंग मंडले व त्यांच्या साथीदारांनी केल्याचे निष्पन्न झाले. हे गुन्हेगार चारचाकी वाहनात येवून तार चोरीचे गुन्हे करत असल्याची त्यांची पद्धत देखील निष्पन्न झाली. बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीसह तांत्रीक विश्लेषणाचा आधार घेत नुरा केरसिंग मोरे हा त्याच्या घरी झिरपांझ ता. धुलकोट जि. बऱ्हाणपुर येथे असल्याची खात्रीशीर माहिती पथकास मिळाली. त्या आधारे त्याला शिताफीने ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केला. रावेर, सावदा, फैजपूर, यावल परिसरातील शेतीमधील विज खांबावरील तारांच्या चोरीत त्याचा शालक अनिल भेरसिंग मंडले, संजु चमार वास्कले, दिना मोरे, सावन उर्फ पंडु मोरे आदींचा सहभाग असल्याचे देखील त्याने कबुल केले.
एकुण 44 गुन्ह्यांची उकल झाली असून टोळीने गुन्ह्यात वापरलेल्या चारचाकी वाहनासह 3 लाख 52 हजार 642 रुपये किमतीच्या तारा हस्तगत करण्यात आल्या आहेत. नुरा केरसिंग मोरे याने चोरीचा मुद्देमाल रावेर शहरातील भंगार व्यावसायीक यासीन हुसेन खान यास विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी रावेर पोलिस स्टेशनला गु.र.न. 20/24 भारतीय विज कायदा कलम 136 या गुन्ह्यात अटकेतील आरोपींना दोन दिवस पोलीस कस्टडी मिळाली आहे. पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधिक्षक अशोक नखाते, सहायक पोलिस अधिक्षक अन्नपुर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.