जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क) : स्नेहलता अनंत चुबळे या सेवानिवृत्त जिल्हा परिषद कर्मचारी होत्या. साळवा ता. धरणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिकेची सेवा बजावल्यानंतर सन 2023 मधे त्या रुग्ण सेवेतून निवृत्त झाल्या होत्या. जळगाव शहरातील खोटे नगर परिसरात त्यांचे स्वत:चे घर होते. त्यांचा विवाहीत मुलगा समीर हा नाशिक येथे खासगी नोकरी करत होता. पुत्र प्रेमापोटी त्या आपल्या पतीसह सेवानिवृत्तीनंतर नाशिक येथेच राहू लागल्या. अधून मधून त्या जळगावला कामानिमीत्त ये जा करत होत्या. जळगाव येथील राहत्या घराची एक खोली वगळता इतर भाग त्यांनी भाड्याने दिला होता. जळगावला कामानिमीत्त आल्यानंतर मुक्कामासाठी ती खोली राखीव ठेवण्यात आली होती.
सेवानिवृत्तीनंतर स्नेहलता यांचे सुखाचे दिवस सुरु होते. त्यांचा सर्वाधिक वेळ नाशिक येथे मुलगा, सुन आणि पतीसोबत व्यतीत होत असे. त्या जळगाव येथील सरकारी नोकरांच्या सहकारी पतपेढीच्या सभासद होत्या. या पतपेढीची 18 ऑगस्ट 2024 रोजी नुतन मराठा महाविद्यालयात बैठक होती. त्या बैठकीसाठी स्नेहलता चुबळे या 17 ऑगस्ट रोजी नाशिक येथून जळगावला येण्यासाठी निघाल्या होत्या. 18 ऑगस्ट रोजी त्यांनी ग. स. सोसायटी अर्थात सरकारी नोकरांच्या सहकारी पतपेढीच्या बैठकीला हजेरी लावली. सेवानिवृत्तीनंतर त्यांना मिळालेल्या तिस लाख रुपयांची त्यांनी रिंगरोडवरील स्टेट बॅंकेच्या कृषी विकास शाखेत एफडी ठेवली होती. ती रक्कम त्यांना काढायची होती. मोठी रक्कम काढायची असल्यास बॅंकेला आगावू सुचना द्यावी लागते. त्यामुळे त्यांनी 19 ऑगस्ट रोजी बॅंकेत जावून आपणास तिस लाख रुपयांची रक्कम विड्रॉल करायची असल्याबाबत सुचना दिली. स्नेहलता चुबळे यांना नाशिक येथे एक फ्लॅट घ्यायचा होता. त्यासाठी त्यांना तिस लाख रुपयांची रक्कम नाशिक येथे घेऊन जायची होती.
स्न्हेलता चुबळे या परिचारिका म्हणून साळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असतांना त्याठिकाणी जिजाबराव अभिमन्यु पाटील नावाचा लिपीक काम करत होता. जिजाबराव पाटील हा लिपिक संघटनेचा जिल्हाध्यक्ष देखील होता. एकाच ठिकाणी दोघांची सेवा झालेली होती. त्यामुळे साहजीकच दोघांची ओळख होती. सेवानिवृत्तीच्या वेळी व नंतर देखील जिजाबराव पाटील याने स्नेहलता यांना वेळोवेळी कार्यालयीन मदत केली होती. त्यामुळे त्यांचा जिजाबराव पाटील याच्यावर विश्वास होता. स्नेहलता चुबळे यांना नाशिक येथे फ्लॅट घ्यायचा आहे आणि त्यासाठी जळगावला आल्यानंतर त्या बॅंकेत तिस लाख रुपयांची रक्कम घेण्यासाठी जाणार असल्याचे जिजाबराव यास माहित होते. रक्कम मोठी असल्यामुळे बॅंकेत मदतीसाठी स्नेहलता चुबळे यांनी जिजाबराव यास मदतीसाठी बोलावले होते.
तिस लाख रुपयांची भलीमोठी रक्कम घेऊन स्नेहलता चुबळे या नाशिकला जाणार असल्याची माहिती समजल्यानंतर जिजाबरावच्या मनात कुविचाराने थैमान घालण्यास सुरुवात केली. लाखो रुपये लबाडीने आपल्याला मिळाले तर आपले भले होईल असा कुविचार त्याच्या डोक्यात घोळू लागला. आजवर स्नेहलता चुबळे यांनी जिजाबराव पाटील याच्यावर खुप विश्वास टाकला होता. या विश्वासातूनच त्यांनी जिजाबराव यास केवळ विड्रॉलच्या वेळी बॅंकेत मदतीसाठी बोलावले होते. मात्र त्याने लागलीच एक प्लॅन आखला. या प्लॅनमधे त्याने त्याचा साथीदार विजय रंगराव निकम यास सहभागी करुन घेतले. विजय रंगराव निकम हा देखील जिल्हा परिषद कर्मचारी होता. तो अमळनेर येथील बांधकाम विभागात लिपिक म्हणून काम करत होता. तो लिपिक संघटनेचा उपाध्यक्ष होता. अशा प्रकारे लिपिक संघटनेचा अध्य्क्ष आणि उपाध्यक्ष असे दोघे जण एकत्र आले. दोघेही अमळनेर येथील रहिवासी होते.
20 ऑगस्टचा दिवस उजाडला. ठरल्यानुसार या दिवशी स्नेहलता चुबळे या बॅंकेत आल्या. जिजाबराव हा देखील त्याची चारचाकी क्रेटा गाडी घेऊन बॅंकेत प्रकट झाला. त्याने त्याचा साथीदार विजय निकम याला सोबत आणले होते. मात्र तो बॅंकेत न येता गाडीतच बसून राहीला. ठरल्यानुसार तिस लाख रुपयांची रक्कम विड्रॉल झाली. यावेळी जिजाबरावने स्नेहलता यांना मदत केली. त्यानंतर त्यांनी जिजाबराव यास मी रिक्षाने घरी जाते व नंतर तेथून नाशिकला जाते असे म्हटले. मला फक्त रिक्षा ठरवून द्या असे तिने जिजाबरावला म्हटले. मात्र कुविचार डोक्यात ठेवून असलेल्या जिजाबरावने त्यांना म्हटले की मला मिटींगसाठी उद्या नाशिकला जायचे आहे. मी तुम्हाला सोडून देतो. तुम्ही माझ्या कारमधे बसा. जिजाबरावने सारखी सारखी गळ घातल्यामुळे इच्छा नसतांना मात्र तरीदेखील केवळ विश्वासावर त्या त्याच्या कारमधे बसल्या. कारमधे अगोदरच पुढच्या सिटवर विजय रंगराव निकम बसलेला होता. तो स्नेहलता चुबळे यांच्यासाठी अनोळखी होता.
वाटेत खोटे नगर नजीक स्नेहलता यांनी त्यांच्या घरापासून काही अंतरावर जिजाबराव यास गाडी उभी करण्यास सांगितले. तिस लाख रुपयांची पिशवी सोबत घेऊन त्या पायी पायी घरी गेल्या. घरी गेल्यानंतर त्यांनी घरगुती सामानाची अजून एक पिशवी सोबत घेतली. त्यानंतर लागलीच त्या पुन्हा गाडीत येऊन बसल्या. त्यानंतर एरंडोल, पारोळा मार्गे तिघे जण नाशिकला जाण्यास निघाले. वाटेत पारोळा गेल्यानंतर स्नेहलता यांनी पती संजय यांना सव्वा सात वाजेच्या सुमारास फोन केला. तो त्यांचा पतीसोबत अखेरचा कॉल ठरला. माझे जळगावचे काम झाले असून मी रात्री अकरा वाजेपर्यंत नाशिकला येत आहे. तुम्ही मला घेण्यासाठी स्टेशनवर या असे स्नेहलता यांनी त्यांच्या पतीसोबत अखेरचे बोलणे केले. त्यानंतर पुढे जिजाबराव पाटील आणि विजय निकम यांच्याकडून आपली हत्या होणार असल्याची पुसटशी देखील कल्पना स्नेहलता चुबळे यांना आली नाही. पतीसोबत त्यांचा तो अखेरचा कॉल होता.
एरंडोल, पारोळा ही दोन्ही गावे गेल्यानंतर पुढे धुळे मार्गे न जाता पारोळ्यानंतर विचखेडा गावापासून नाशिकला जाणा-या रस्त्याचा जिजाबरावने वापर केला. दरम्यान मागच्या सिटवर बसलेल्या स्नेहलता यांना डुलकी रात्रीचा अंधार आणि गार वारा लागत असल्यामुळे झोप लागण्यास सुरुवात झाली. स्नेहलता चुबळे यांना झोप लागली होती. या संधीचा फायदा घेत आर्वी गावानजीक दोघांनी स्नेहलता यांचा मोबाईल बंद करुन टाकला. पुढे काही अंतर गेल्यानंतर जिजाबरावने गाडी उभी केली. याठिकाणी दोघांनी मिळून स्नेहलता यांचा त्यांच्याच स्कार्फने गळा आवळण्यास सुरुवात केली. झोपेतच त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आली. ती त्यांची काळरात्र ठरली.
गाडीतील दोघांनी सोबत गोणपाट आणि सुतळी अशा वस्तू आवर्जून हेतूपुर्वक आणल्या होत्या. निर्जन ठिकाणी गाडी उभी करुन दोघांनी मिळून स्नेहलताचा मृतदेह गोणपाटात टाकला. गोणपाट सुतळीने बांधून बंद केले. आजवर स्नेहलताने जिजाबराव याच्यावर टाकलेला विश्वास केव्हाच संपला होता. निव्वळ तिस लाखांच्या रकमेसाठी जिजाबरावने त्याचा साथीदार विजयच्या मदतीने स्नेहलताची हत्या केली. स्नेहलताच्या विश्वासाची जिजाबरावने काहीच किंमत केली नाही. त्यानंतर आर्वी गावापासून मालेगाव, शिरुड चौफुलीअशा रस्त्याने टोलनाका वाचवत दोघांनी मयत स्नेहलताच्या मृतदेहाचे गोणपाट सोबत घेत धुळे शहराच्या दिशेने मार्गक्रमण सुरु केले. आपण टोल नाक्याच्या सिसीटीव्ही फुटेजमधे दिसू नये यासाठी त्यांनी टोल नाका वाचवत वाचवत मार्गक्रमण करत चाळीसगाव चौफुलीमार्गे धुळे गाठले. त्यानंतर फागणे – अमळनेर मार्गे शिरपूर महामार्गावरील तापी नदीचा पुल गाठला. त्यावेळी रात्रीचे सुमारे साडेदहा ते अकरा वाजेची वेळ होती. सततधार सुरु असलेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता.
तापी नदीच्या पात्रापासून सुमारे अडीचशे फुट उंचीच्या पुलावरुन भर पावसात दोघांनी स्नेहलताच्या मृतदेहाचे सुतळीने बांधलेले पोते दोघांनी मिळून नदीच्या पाण्याच्या ओसंडून वाहणा-या प्रवाहात फेकून दिले. दोघांजवळ जराही दयामाया उरली नव्हती. केवळ तिस लाखांसाठी ते मानवी रुपातील राक्षस बनले होते. तिस लाखांची बॅग वगळता स्नेहलता चुबळे यांच्याजवळ असलेली पर्स, मोबाईल आणि घरगुती सामानाची पिशवी असे साहित्य देखील दोघांनी नदीच्या प्रवाहात फेकून दिले.
तेथून यु टर्न घेत दोघांनी नरडाणा मार्गे अमळनेरच्या दिशेने गाडी हाकली. दोघेही अमळनेरचे रहिवासी होते. अमळनेर गावाच्या बाहेर गाडी उभी करुन दोघांनी प्रत्येकी पंधरा पंधरा लाखाची रक्कम वाटून घेतली. त्यानंतर जणू काही झालेच नाही अशा अविर्भावात दोघांनी आपआपल्या घरी प्रवेश केला. दरम्यान रात्र उलटली तरी स्नेहलता चुबळे नाशिकला पोहोचल्या नाही, त्यांचा फोनदेखील बंद येत होता म्हणून त्यांचे पती व मुलगा असे दोघेजण हैराण झाले. दुस-या दिवशी 21 ऑगस्ट 2024 रोजी स्नेहलता यांचे पती व मुलगा समीर या दोघांनी जवळपासचे मित्र व नातेवाईक यांच्याकडे फोन करुन त्यांची विचारपुस केली. मात्र कुणाकडेही स्नेहलता आलेल्या नव्हत्या. त्यामुळे दोघा पिता पुत्रांच्या बेचैनीत अजूनच भर पडली.
दरम्यान स्नेहलता यांची मुलगी मयुरी हिला तिच्या धरणगाव तालुक्यातील चांदसर येथील मामांकडून समजले की तिच्या आईला नाशिक येथे फ्लॅट घ्यायचा होता. तो फ्लॅट घेण्यासाठी स्नेहलता यांनी जळगाव येथील रिंगरोड परिसरातील स्टेट बॅंक ऑफ इंडीयाच्या कृषी विकास शाखेतून तिस लाख रुपयांची रक्कम 20 ऑगस्ट रोजी काढली होती. ती रक्कम काढतांना मदतीसाठी त्यांच्यासोबत जिजाबराव पाटील हा हजर होता. त्यानंतर 22 ऑगस्ट रोजी पुन्हा दोघा पिता पुत्रांनी मिळून स्नेहलता यांचा शोध घेतला. परंतू त्यांचा कुठेही शोध लागला नाही. त्यामुळे दोघा पिता पुत्रांनी सोबतच जळगाव तालुका पोलिस स्टेशन गाठत आपली कैफीयत मांडली. सुरुवातीला या घटनेप्रकरणी मिसींग दाखल करण्यात आली. 61/2024 या क्रमांकाने 23 ऑगस्ट 2024 रोजी दाखल करण्यात आलेल्या या मिसींगचा पुढील तपास हे.कॉ. अनिल मोरे यांच्याकडे देण्यात आला. जळगाव तालुका पोलिस आपल्या पातळीवर या मिसींगचा तपास करत होते. स्नेहलता यांचे पती व मुलगा असे दोघेजण देखील त्यांच्या पातळीवर याबाबत सर्वत्र चौकशी करत होते.
बेपत्ता स्नेहलता चुबळे यांचा मुलगा समीर, पती संजय, मुलगी मयुरी आदींनी थेट जिजाबराव पाटील याची भेट घेत त्याला तुम्ह स्नेहलता सोबत बॅकेत गेले होते का अशी विचारणा केली. त्यावर जिजाबराव याने त्यांना सांगितले की मी 20 ऑगस्ट रोजी स्नेहलता यांच्यासोबत बॅंकेत गेलो होतो. त्यांना तिस लाख रुपयांची रक्कम काढण्याकामी मदत केली. त्यानंतर मी त्यांना रोख रकमेच्या बॅगसह रिक्षात बसवून दिले. त्यानंतर पुढचा घटनाक्रम आपल्याला माहिती नाही असे त्याने सर्वांना सांगितले. त्यानंतर सर्वजण खोटे नगर येथील त्यांच्या घराचे भाडेकरी किरण गोसावी यांच्या आईची भेट घेण्यासाठी गेले. किरण गोसावी यांच्या आईने समीर यास सांगितले की तुझी आई 20 ऑगस्टच्या सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घरी आली होती. मात्र मला लागलीच जायचे आहे असे सांगून लगेच निघून गेली होती.
त्यानंतर पुन्हा सर्वांनी जळगाव तालुका पोलिस स्टेशन गाठत मिसींगचा तपास करणा-या हे.कॉ. अनिल मोरे यांची भेट घेतली. हे.कॉ. अनिल मोरे यांनी संबंधीत स्टेट बॅंकेच्या शाखेत जावून 20 ऑगस्ट या तारखेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात त्यांना कॅश काऊंटरवरुन पैसे घेतांना स्नेहलता आणि त्यांच्यासोबत जिजाबराव पाटील असे दोघे जण दिसून आले. स्नेहलता यांच्या मोबाईलचे लोकेशन पारोळा दिसून आल्याने त्याठिकाणी देखील तपास करण्यात आला. मात्र त्यात काही निष्पन्न झाले नाही.
बघता बघता मिसींग दाखल होऊन दहा दिवसांचा कालावधी उलटला. मात्र मिसींगचा तपास पुढे सरकत नव्हता. अखेर स्नेहलता चुबळे यांच्या पती व मुलाने सोबत पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेत आपली व्यथा आणि घातपाताची शंका कथन केली. विषय गंभीर असल्याचे डॉ. रेड्डी यांच्या लक्षात येण्यास वेळ लागला नाही. त्यांनी अजिबात वेळ न दवडता समांतर तपासाची सुत्रे स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बबन आव्हाड यांच्याकडे सोपवली. पो.नि. बबन आव्हाड यांनी तातडीने गुणवत्ताधारक माहितगार कर्मचा-यांचे एक पथक तयार केले. या पथकात सहायक फौजदार विजयसिंग पाटील, हे.कॉ. सुधाकर अंभोरे, हे.कॉ. जितेंद्र पाटील, अकरम शेख, महेश महाजन, लक्ष्मण पाटील, पोलिस नाईक राहुल पाटील, भारत पाटील आदींचा समावेश करण्यात आला. या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कसून तपास सुरु केला.
संशयाची सुई असलेल्या जिजाबराव पाटील यास चौकशीकामी बोलावून त्याची सखोल चौकशी केली. त्यावेळी जिजाबराव याने मी बॅंकेत स्नेहलता यांच्या सोबत पैसे काढतांना सोबत होतो आणि त्यानंतर त्यांना घरी खोटे नगरपर्यंत सोडल्याचे सांगितले. यापुर्वी स्नेहलता यांच्या मुलाला त्याने म्हटले होते की मी त्यांना रिक्षात बसवून दिले होते. अशा प्रकारे वेगवेगळे वक्तव्य त्याने केले. त्याचे बोलणे संशयास्पद आणि बोलण्यात तफावत आढळून आल्याने त्याच्या मोबाईलचे कॉल डीटेल्स काढण्यात आले.
त्याच्या मोबाईल कॉल डीटेल्समधे त्याचे विजय निकम याच्यासोबत सर्वाधिक बोलणे झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याला स्वतंत्रपणे चौकशीकामी बोलावण्यात आले. त्याने वेगळीच स्क्रिप्ट पोलिस पथकला कथन केली. दोघांच्या बोलण्यात तफावत असल्याचे पोलिस पथकाच्या लक्षात आले. संशयाची सुई जिजाबराव अभिमन्यु पाटील आणि विजय रंगराव निकम यांच्याकडे फिरु लागली. तिस लाख रुपयांच्या लालसेपोटी स्नेहलता चुबळे यांचा घातपात केला असल्याच्या संशयाखाली दोघांविरुद्ध जळगाव तालुका पोलिस स्टेशनला हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. स्नेहलता चुबळे यांचा मुलगा समीर संजय देशमुख याने दिलेल्या फिर्यादीनुसार गु.र.नं. 312/2024 प्रमाणे भारतीय न्याय संहिता 2023 कलम 103(1), 61(2), 238, 3(5) प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला. जिजाबराव अभिमन्यु पाटील व विजय रंगराव निकम या दोघांनी स्नेहलता संजय चुंबळे यांच्या जवळ असलेल्या तिस लाख रुपयांच्या रकमेच्या लालसेपोटी घातपात करुन त्यांना जिवे ठार करुन त्यांच्या मृतदेहाची कुठेतरी विल्हेवाट लावल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेने दोघा संशयीत आरोपींना अटक केली. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना 11 सप्टेबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडी दरम्यान दोघांनी आपला गुन्हा कबुल केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांची सखोल चौकशी, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, संशयीतांचे कॉल डिटेल्स आदी बाबी व्यवस्थित हाताळल्या. मासेमारी करणा-या पथकाच्या माध्यमातून स्नेहलता चुबळे यांच्या मृतदेहाच्या पोत्याचा आणि त्यांच्या वस्तूंचा घटनास्थळावरील नदी पात्रात शोध लावला जात आहे. मासेमारी करणा-या पट्टीच्या पोहणा-यांच्या मदतीने स्नेहलता यांचा मृतदेह हुडकून काढण्याचे कसोशीने प्रयत्न सुरु असून मृतदेह शोधून देणा-यांना योग्य ते बक्षीस दिले जाईल असे त्यांना सांगण्यात आले आहे.
पोलिस कोठडीदरम्यान दोघा संशयीतांनी गुन्ह्यात वापरलेली कार आणि दोघांनी अर्धे अर्धे वाटून घेतलेले एकुण तिस लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा शोध लावला. पुढील तपास जळगाव तालुका पोलिस स्टेशनचे पो.नि. महेश शर्मा व त्यांचे सहकारी पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील, गणेश साईकर, पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रवीण पाटील, केतन पाटील आदी करत आहेत.
मोह हे दुखा:चे कारण असते. मोहात पडलेल्या मनुष्याच्या नशीबी कोणत्या ना कोणत्या रुपाने दुख: येते. एखाद्यावर अती विश्वास टाकणे हा घटक देखील दुखा:स कारणीभूत ठरतो. त्यासाठी मोह आणि परक्यावर अती विश्वास टाकणे या दोन गोष्टी मनुष्याने लक्षपुर्वक करायला हव्या असे या घटनेच्या निमीत्ताने सांगावेसे वाटते. जिजाबराव पाटील आणि विजय निकम या दोघांना तिस लाख रुपयांचा मोह झाला. आणि या मोहातूनच त्यांच्या हातून गुन्हा घडला. मयत बेपत्ता स्नेहलता चुबळे यांनी जिजाबराव पाटील याच्यावर अती विश्वास टाकला आणि हिच चुक त्यांना भोवली आणि प्राणास मुकावे लागले. जीवनभर परिचारिकेची सेवा करुन त्यांनी तिस लाख रुपये जमा केले. जिजाबराव पाटील याने त्यांना 28 लाख रुपयात नाशिकला फ्लॅट मिळवून देतो असे सांगितले असल्याचे देखील म्हटले जात आहे. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी बॅंकेतून रक्कम काढल्याचे म्हटले जात आहे. एवढी मोठी रक्कम स्नेहलता बॅंकेतून काढणार असल्याची माहिती त्यांच्या पती व मुलाला माहिती नव्हती. ती माहिती परक्या जिजाबराव पाटील यास माहिती होती. अखेर त्या तिस लाख रुपयांची रक्कम बघून जिजाबरावची नियत फिरली. त्यामुळे त्याने विजय निकम याला देखील या कटात सहभागी करुन घेतले. पर्यायाने तो देखील मोहात पडला आणि गुन्ह्यात अडकला. मोहात पडणारा आणि परक्यावर अती विश्वास ठेवणारा असे दोघेही दुखा:ला आमंत्रण देत असतात.