जळगाव : बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत ट्रॉन्सपोर्ट व्यावसायिकाकडून रोख एक लाख रुपये व चार लाख रुपयांचा धनादेश स्वीकाणाऱ्या महिलेसह तिच्या साथीदाराला एमआयडीसी पोलिसांनी रंगेहाथ पकडले. शनिवार 7 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे.
एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील ट्रॉन्सपोर्ट व्यावसायिकाची वकील राठोड (रा. रामदेववाडी, ता. जळगाव) या हॉटेल चालक तरुणासोबत ओळख झाली. वकील राठोड याने त्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची एका महिलेसोबत ओळख करुन दिली. त्यानंतर व्यावसायिकाचे महिलेसोबत संबंध सुरु झाले. या संबंधाच्या बदल्यात व्यावसायिकाने त्या महिलेला पैसेही दिले. त्यानंतर महिलेला पैशांची चटक लागली. ती त्याच्याकडे काही ना काही कारण पुढे करत पैसे मागू लागली.
ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने त्या महिलेला 71 हजार 500 रुपये व ओळख करून देणारा वकील राठोड याला 15 हजार रुपये दिले. दिवसेंदिवस महिलेची मागणी वाढत गेली. पैसे दिले नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची ती धमकी देऊ लागली. ठरल्यानुसार एका दुकानावर एक लाख रुपये रोख आणि चार लाख रुपयांचा धनादेश देण्या घेण्याचे ठरले. व्यावसायिकाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार सापळा रचण्यात आला आणि एमआयडीसी पोलीस पथकाने दोघांना रंगेहात पकडले. दोघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सपोनि माधुरी बोरसे करत आहेत.