पोलिस निरीक्षक एम.एम. कासार अर्थात मुरलीधर माधव कासार सध्या जामनेर पोलिस स्टेशनला कार्यरत आहेत. त्यांचा आणि माझा परिचय सन 2004 पासून. त्यावेळी ते जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनला पोलिस उप निरीक्षक म्हणून नेमणूकीला होते. जळगावच्या सिंधी कॉलनी परिसरातील कंवर नगर पोलिस मदत केंद्राचे ते प्रमुख होते. सन 2004 पासून त्यांच्यासोबत असलेला परिचय लवकरच दोस्तीत परावर्तीत झाला. याचे कारण म्हणजे त्यांच्या अंगी असलेला मनाचा दिलदारपणा.
पोलिस अधिका-याच्या अंगी असलेले सर्व गुण त्यांच्या अंगी ठासून भरलेले आहेत. याशिवाय एका मित्राच्या अंगी जे गुण आवश्यक असतात ते सर्व गुण देखील त्यांच्या अंगी तेवढेच ठासून भरलेले आहेत. सन 2004 मधे जळगावच्या कंवर नगर पोलिस मदत केंद्रात त्यांची आणि माझी सातत्याने भेट होत असे. ती भेट एक पोलिस अधिकारी आणि एक पत्रकार या नात्याने नव्हे तर एक मित्र म्हणूनच.
सध्या ते जामनेर पोलिस स्टेशनला कार्यरत आहेत. जामनेर हे माझ्या आवडीचे तालुक्याचे ठिकाण. याच जामनेर मधे शिर्डीचे साईबाबा येऊन गेले आहेत. जामनेर पोलिस निरीक्षकांच्या शासकीय निवासस्थानी साईबाबा त्या काळात टांगा चालकाच्या रुपात वेश बदलून आले होते. या निवासस्थानात त्याकाळी एक महसुल अधिकारी रहात होते. त्यांच्या भेटीला आलेल्या साईबाबांच्या पदस्पर्शाने हे निवासस्थान पावन झाले आहे. या निवासस्थानी राहण्यास येणारा प्रत्येक अधिकारी जणूकाही भाग्यशाली असतो. ती संधी आमचे अधिकारी मित्र मुरलीधर कासार यांना लाभली आहे.
गेल्या पंचवीस वर्षाच्या माझ्या गुन्हेगारी विषयावरील पत्रकारितेच्या कालावधीत सर्व जुन्या अधिका-यांपैकी केवळ एम. एम. कासार हेच आजच्या घडीला जळगाव जिल्ह्यात
उपलब्ध आहेत. या विस ते पंचवीस वर्षाच्या कालावधीत माझ्या नजरेसमोर जे पीएसआय होते ते आज विविध ठिकाणी पोलिस निरीक्षक तर काही डिवायएसपी झाले
आहेत. आज नवनवीन अधिकारी पोलिस खात्यात येताहेत. अनेक परिवर्तन बघण्यात आले. जुन्या अधिकारी वर्गाच्या अंगी माणूसकी जपण्याची एक अंगभुत कला होती. त्यामधे सेवानिवृत्त अधिकारी डी. डी. गवारे यांचे नाव प्रकर्षाने पुढे येते. ती कला नव्याने पोलिस दलात दाखल झालेल्या अनेक अधिक-यांमधे नसल्याचे आजच्या घडीला प्रकर्षाने जाणवते.