जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क): आजची तरुण पिढी या देशाचे उज्वल भवितव्य आहे. या देशाला, या राष्ट्राला आणि या समाजाला तरुणांची नितांत गरज आहे असे भारदस्त वाक्य भाषणात बोलायला आणि निबंधात लिहायला फार बरे वाटते. मात्र वास्तवतेमधे आजच्या तरुण पिढीचा आजची मतलबी नेते मंडळी वापर करुन घेत आहे. आजच्या तरुणांना चांगले शिक्षण आणि त्यांना चांगली नोकरी कशी मिळेल याचा ख-या अर्थाने विचार करणे गरजेचे आहे. तरुणांमधे शिक्षण आणि संस्कृतीची कमतरता राहू नये. आजची तरुण पिढी पुर्णपणे साक्षर आणि निर्व्यसनी असावी असा विचार ज्यावेळी आजच्या नेतेमंडळींच्या मनात येईल त्यावेळी हा देश ख-या अर्थाने सुजलाम – सुफलाम होईल असे म्हणता येईल. आजची तरुण पिढी मोठ्या संख्येने व्यसनाच्या आहारी जात असल्याचे आपण बघतो. त्यामुळे संस्कृतीचा नाश होत आहे. शिक्षणाच्या अभावामुळे तरुण पिढी एक प्रकारे विनाशाकडे वाटचाल करत आहे. मद्याचे व्यसन आणि शिक्षणाचा अभाव असलेल्या दोघा मित्रांनी त्यांच्या एका मित्राची धावत्या बसच्या खिडकीतून फेकून दिल्याने मृत्यू झाल्याची घटना काही महिन्यापुर्वी जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर पोलिस स्टेशन हद्दीतील महामार्गावर घडली. वरवर हा रस्ता अपघाताचा प्रकार वाटत असला तरी पोलिस निरीक्षक नागेश मोहिते आणि त्यांचे सहकारी पोलिस उप निरीक्षक राहुल बोरकर यांच्या तल्लख बुद्धीने हा खूनाचा प्रकार उघडकीस आला.
सिद्धार्थ विकास बनसोड, स्वप्नील गजराम परिहार आणि भरत चुनिलाल रहांगडाले हे तिघे मित्र होते. तिघेही गोंदीया जिल्ह्यातील रहिवासी होते. तिघे एकमेकांना चांगल्या प्रकारे परिचीत होते. तिघांमधे शिक्षणाचा अभाव होता आणि तिघांना मद्यपानाची सवय जडली होती. मद्याच्या नशेत असले म्हणजे तिघे एकमेकांना शिवीगाळ व मारहाण करत असत.
सिद्धार्थ विकास बनसोड, स्वप्नील गजराम परिहार आणि भरत चुनिलाल रहांगडाले हे तिघे गोंदीया जिल्ह्यातील बेरोजगार तरुण मित्र सुरत येथे नोकरी मिळवण्यासाठी सोबत गेले होते. त्या ठिकाणी तिघांची वैद्यकीय चाचणी झाली. या चाचणीत तिघे मद्यपी मित्र एकाचवेळी फेल झाले. त्यामुळे तिघांवर आपापल्या गावी गोंदीया जिल्ह्यात परत जाण्याची वेळ आली. तिघांकडे परतीच्या प्रवासासाठी पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे ठेकेदार कंपनीने तिघांना परतीचा प्रवास व इतर खर्चासाठी रोख बाराशे रुपये दिले. मोजक्या पैशात तिघे मित्र आपापल्या गावी नागपूरला जाणा-या लक्झरी बसने जाण्यास निघाले. दोन सिटवर दाटीने तिघे बसून प्रवास करु लागले. 5 जुलैच्या रात्रीच्या अंधारात प्रवासादरम्यान बाराशे रुपयांच्या वाटणीवरुन तिघांमधे वाद सुरु झाले. बघता बघता हा वाद पराकोटीला गेला.
सिद्धार्थ बनसोड हा त्याचे साथीदार स्वप्नील परिहार आणि भरत रहांगडाले या दोघांना शिवीगाळ करु लागला. स्वप्निल आणि भरत हे दोघेही त्याला अर्वाच्च भाषेत बोलत होते. ते प्रवास करत असलेली बस जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर परिसरातून जाणा-या महामार्गावरुन धावत होती. त्यावेळी त्यांचा वाद शिगेला पोहोचला होता. मुक्ताईनगर पोलिस स्टेशन हद्दीतील चंद्रोदय पेट्रोल पंप नजीक संतापाच्या भरात स्वप्निल आणि भरत या दोघांनी सिद्धार्थ यास धावत्या बसच्या खिडकीतून बाहेर फेकून दिले. रात्रीची वेळ होती. सर्व प्रवासी झोपेच्या अधिन गेले होते. या बसच्या चालक कॅबीनचा दरवाजा व खिडक्या प्लायवूडच्या स्लायडींग स्वरुपातील होत्या. त्यामुळे चालक, वाहकाला देखील आपल्या बसमधून कुणी बाहेर फेकला गेल्याचा आवाज आला नाही. यावेळी मागच्या बाजूने कोणतेही वाहन येत नव्हते. त्यामुळे पाठीमागून येणा-या वाहनाच्या लाईटाचा प्रकाशझोत घटनेच्या वेळी पडला नाही. एकंदरीत अंधाराच्या साम्राज्यात सिद्धार्थ बाहेर फेकला गेला. डोक्यावर आपटला गेल्याने त्याचा काही वेळाने मृत्यू झाला.
दरम्यान पहाटेच्या अंधारात पितांबर अरुण गुरव या जागरुक नागरिकास सिद्धार्थ बनसोड या तरुणाचा मृतदेह महामार्गावर आढळून आला. मयत सिद्धार्थ बनसोड हा पितांबर गुरव यांच्यासाठी अनोळखी होता. त्यांनी या घटनेची माहिती हरताळा येथील पोलिस पाटील सौ. स्नेहल प्रदिप काळे यांना फोनद्वारे कळवली. त्यामुळे सौ. स्नेहल काळे यांनी आपल्या पतीसह घटनास्थळी जावून खात्री केली. घटनास्थळावर मयत अवस्थेत पडलेल्या तसेच लोकांच्या दृष्टीने अनोळखी इसमाच्या डोक्याला जबर मार लागलेला होता. दरम्यानच्या कालावधीत एका ट्रकचालकाने मलकापूर हद्दीतील दसरखेडा एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली की कुणीतरी अज्ञात व्यक्ती कोणत्यातरी लक्झरी बसमधून महामार्गावर पडला असून तो मयत झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे पो.नि. नागेश मोहिते व त्यांचे सहकारी पोलिस उप निरीक्षक राहुल प्रशांत बोरकर, पो.ना. संदीप वानखेडे, पो.कॉ. निखील नारखेडे, पो. कॉ. मुकेश महाजन, ईश्वर पाटील, गौरव पाटील आदींनी घटनास्थळ गाठत पुढील कारवाई व तपासाला सुरुवात केली.
मयत सिद्धार्थ हा घटनास्थळावर जमलेल्या नागरिकांसह पोलिसांसाठी अनोळखी होता. त्याला कुणीही ओळखत नव्हते. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीकामी मुक्ताईनगर उप जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आला. या घटनेप्रकरणी पोलिस पाटील स्नेहल काळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. अज्ञात व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गु.र.न. 245/24 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 106 (2), 281, मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 134 (ब), 184 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान मयत हा त्याने परिधान केलेल्या कपड्यावरुन भिकारी वाटत नव्हता. त्याच्या खिशात कोणतेही ओळखपत्र नव्हते. त्याच्या एकंदरीत पेहरावावरुन आणि केवळ डोक्याला झालेल्या जखमांवरुन हा अपघाताचा नव्हे तर घातपाताचा प्रकार असल्याचा संशय पोलिस निरीक्षक नागेश मोहिते आणि त्यांचे सहकारी पोलिस उप निरीक्षक राहुल बोरकर यांना आला. त्यांनी त्या दृष्टीने पुढील तपासाला सुरुवात केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक राहुल बोरकर यांच्याकडे देण्यात आला.
तपासाधिकारी पोलिस उपनिरीक्षक राहुल बोरकर यांनी दसरखेडा टोल नाक्यावर जाऊन येणा-या जाणाऱ्या लक्झरी बसेससह ट्रकचा तपशील संकलीत केला. कोणत्या वेळेला किती आणि कोणत्या क्रमांकाचे ट्रक, लक्झरी बसेस रवाना झाल्या याची देखील माहिती त्यांनी संकलीत केली. टोलनाक्यावरुन सर्व माहितीचा तपशील घेतल्यानंतर एमएच 18 एम 3397 या ट्रकवरील चालकाने दसरखेडा पोलिसांना या घटनेची माहिती दिल्याचे निष्पन्न झाले.
मुक्ताईनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतून हा ट्रक किती वाजता मलकापूरकडे रवाना झाला असेल या दृष्टिकोनातून पोलिस उप निरीक्षक राहुल बोरकर यांनी पुढील तपासाला दिशा दिली. या कालावधीतील सीसीटीव्ही फुटेज संकलीत करण्यात आले. जवळपास सत्तर लक्झरी बसेसची ये-जा या कालावधीत झाली असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यातील नागपूरच्या दिशेने रवाना झालेल्या लक्झरी बसेसची माहिती घेत त्यातील तीन बसेसवर संशय व्यक्त करण्यात आला. या तिन्ही लक्झरी बसेस मधील नोंद असलेल्या प्रवाशांची माहिती घेण्यात आली. या लक्झरी बसेस कोणत्या हॉटेलवर अथवा ढाब्यांवर थांबल्या होत्या याची देखील माहिती घेण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजमधे या सिट क्रमांकावरील तिघे आढळून आले.
थक्क करणा-या या तपासातील माहितीच्या आधारे या लक्झरी बसमधील स्वप्निल गजराम परिहार (रा. बोदा ता. तिरोडा, जि. गोंदिया) या प्रवाशाच्या भ्रमणध्वनीवरुन या बसचे तिकीट नागपूर पर्यंत बुक झाल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे मुक्ताईनगर पोलिसांचे एक पथक तातडीने गोंदीया जिल्ह्यातील तिरोडा या गावी पोहोचले. तिरोडा या गावातील सहा गावांची माहिती घेतली असता त्यातील बोदा येथील रहिवासी असलेल्या स्वप्निल परिहार या तरुणाचा शोध लागला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याचा साथीदार भरत चुनीलाल रहांगडाले (रा. भजेपार ता. तिरोडा) याचे नाव पुढे आले. त्यामुळे त्याला देखील पोलिस पथकाने ताब्यात घेतले. दोघांनी पोलिसी खाक्या बघून आपण दोघांनीच सिद्धार्थ विकास बनसोड (रा. गोंडवाडी ता. तिरोडा) याला सीट क्रमांक 9 व 10 च्या खिडकीतून धावत्या लक्झरी बसमधून फेकून दिल्याची कबुली दिली. प्रवासादरम्यान मयत सिद्धार्थ हा वेड्यासारखा अंगावर धावून येत मद्याच्या नशेत पैशांची मागणी करत होता. त्यामुळे रागाच्या भरात त्याला दोघा मद्यपी मित्रांनी बसच्या खिडकीतून फेकून दिल्याची कबुली दिली. दोघांना अटक करण्यात आली. अटकेतील दोघांना मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला आणण्यात आले. दोघांना पो.नि. नागेश मोहिते यांच्यासमक्ष हजर करण्यात आले. अशा प्रकारे हा रस्ता अपघात नसून घातपाताचा प्रकार असल्याचे पो.नि. नागेश मोहिते आणि पोलिस उप निरीक्षक राहुल बोरकर यांच्या चाणाक्ष बुद्धीने तेरा दिवसात उघड केले.