पोलवरील विजेच्या तारा चोरणारे तिघे जेरबंद

जळगाव : महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या वीज पुरवठा करणाऱ्या पोल वरील ॲल्युमिनियम तारांची चोरी करणाऱ्या टोळीतील तिघांना पारोळा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. समाधान नारायण पाटील (रा-एरंडोल). रविंद्र अनिल मिस्तरी (रा. साईनगर एरंडोल) व धनराज प्रकाश ठाकुर (रा. अमळनेर दरवाजा एरंडोल) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. 

पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना समजलेल्या माहितीच्या आधारे विजेच्या अल्युमिनियम तारांची चोरी करणा-या समाधान पाटील यास चार चाकी वाहनासह पारोळा तालुक्यातील सांगवी येथून संशयास्पदरित्या फिरतांना ताब्यात घेण्यात आले. अंगझडती दरम्यान त्याच्याजवळ तार कापण्याची पकड आढळून आली. सखोल चौकशी त्याने रवींद्र अनिल मिस्तरी (रा. साईनगर एरंडोल) व धनराज प्रकाश ठाकूर (रा. अमळनेर दरवाजा एरंडोल) या दोघांची गुन्ह्यातील सहभागी साथीदारांची नावे उघड करत वीज तार चोरीचे गुन्हे कबुल केले. त्या दोघांनाही शिताफीने ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्यांनीही आपला गुन्हा कबुल केला. 

पारोळा पोलिस स्टेशन हद्दीत दोन वेगवेगळया ठिकाणी व एरंडोल पोलिस स्टेशन हद्दीत तीन वेगवेगळया ठिकाणी ईलेक्ट्रीक अँल्युमिनीयम तार चोरी केल्याची तिघांनी कबुली दिली आहे. त्यामुळे पारोळा पो स्टे कडील दोन वेगवेगळे गुन्हे व एरंडोल पो स्टे कडील तीन वेगवेगळे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिस निरीक्षक सुनिल पवार यांच्या पथकातील पोउनि राजु जाधव, पोहेकॉ सुनिल हटकर, पोहेकॉ प्रविण पाटील, पोकॉ अशिष गायकवाड, योगेश शिंदे, अनिल वाघ आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here