ट्रकमधील डिझेल व रोकड चोरी करणारी टोळी गजाआड 

नाशिक : उभ्या ट्रक मधील 200 लिटर डिझेल व केबिनमध्ये ठेवलेले 35 हजार रुपये रोख असा 49 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी करणाऱ्या टोळीस नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या शोध पथकाने अटक केली आहे या घटनेप्रकरणी सिन्नर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सिन्नर शिडी महामार्गावर शंकरनगर परिसरातील एच. पी. पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या बारा टायर ट्रकच्या इंधन टाकीतून दोनशे लिटर डिझेल व कॅबीनमध्ये ठेवलेले 35 हजार रूपये रोख असा एकुण 49 हजार रुपयांचा मु‌द्देमाल चोरून नेला होता. सिन्नर पोलीस स्टेशनला दाखल या चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे आणि त्यांचे सहकारी करत होते. 

या गुन्ह्यातील आरोपीतांची गुन्हा करण्याची पध्दत व पोलिस अभिलेख्यावरील आरोपीतांची माहिती घेवून पुढील तपास सुरु होता. अहमदनगर जिल्हयातील डिझेल चोरी करणारी टोळी शिर्डी-सिन्नर रोडवर एका कारमध्ये येणार असल्याची खात्रीशीर बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार विनोद टिळे यांना समजली. त्या माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला. आलेल्या दोन्ही कारमधील संशयित इसमांची चौकशी व अंगझडती घेण्यात आली. 

रोहन अनिल अभंग (रा. देवाचा मळा, संगमनेर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर), वैभव बाबासाहेब सुरवडे (रा. जामखेड, ता. जामखेड, जि. अहमदनगर), दादासाहेब दिलीप बावचे (रा. बोधेगाव, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) यांना ताब्यात घेवुन त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीअंती त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. तसेच या गुन्ह्यात त्यांचे साथीदार  समाधान देविदास राठोड (रा. कोपरगाव, जि. अहमदनगर) व सचिन देविदास डाले (रा. येवला, ता. येवला, जि. नाशिक हल्ली रा. शिर्डी) यांचा देखील सहभाग असल्याचे कबुल केले.

रोहन, वैभव आणि दादासाहेब यांना अटक करण्यात आली. त्यांच्या कब्जातील गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही कार, 10 हजार 500 रुपये रोख, मोबाईल फोन तसेच बनावट नंबर प्लेट असा एकुण 12 लाख 58 हजार 500 रुपये किमतीचा मु‌द्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपासकामी अटकेतील तिघांना सिन्नर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. अटकेतील तिघांकडून अजून डिझेल चोरीचे काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या दोघा फरार साथीदारांच्या मागावर पोलीस पथक असून लवकरच त्यांना देखील अटक केली जाणार आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सपोनि संदेश पवार, सहायक फौजदार नवनाथ सानप, पोना विनोद टिले, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम आदींनी या कामगिरीत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here