सोनसाखळी चोरट्यास एलसीबी पथकाने केली अटक

जळगाव : छत्रपती संभाजी नगर येथे महिला शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याची 18 ग्रॅम वजनाची चेन हिसकावून पळून जाणाऱ्या दोघा मोटरसायकलस्वार चोरट्यांपैकी एकास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातून ताब्यात घेतले. त्याला छत्रपती संभाजी नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे. प्रशांत उर्फ चोर बाप्या पंडितराव साबळे (रा. सुप्रीम कॉलनी जळगाव) असे अटकेतील जळगाव पोलिसांच्या रेकॉर्डवरील चोरट्याचे नाव आहे. 

दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती संभाजी नगर येथील रहिवासी शिक्षिका सुनीता भिमराव नेमाने या पायी मार्गक्रमन करत असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन मोटरसायकलवर आलेल्या दोघांपैकी मागील सीटवर बसलेल्या चोरट्याने बळजबरी हिसकावून घेतली होती. त्यानंतर दोघे मोटरसायकलवर फरार झाले होते. या घटने प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील जवाहर नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या गुन्ह्यातील चोरटा प्रशांत उर्फ चोर बाप्या हा जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी येथील रहिवासी असल्याचे जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या तपासणीत निष्पन्न झाले. त्यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, संजय हिवरकर, रवींद्र नरवाडे, पोलीस हवालदार विजय पाटील, राजू मेढे, हरिलाल पाटील आदींनी त्यास सुप्रीम कॉलनी परिसरातून ताब्यात घेत अटक केली. त्याने या गुन्ह्याच्या व्यतिरिक्त अजून दोन गुन्हे केल्याचे कबूल केले. अशाप्रकारे छत्रपती संभाजी नगर येथील सोनसाखळी चोरीचे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. छत्रपती संभाजी नगर पोलिसांच्या ताब्यात दिलेला प्रशांत साबळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी दहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दुस-या फरार साथीदाराचा शोध सुरु आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here