जळगाव : ऑनलाइन गेम ॲपच्या माध्यमातून लोकांना प्रलोभन दाखवून पैसे गुंतवणूक करण्यास प्रोत्साहीत करुन पैशांच्या हारजीतचा खेळ खेळवणा-या सहा जणांना अटक करून त्यांच्याविरुद्ध रावेर पोलीस स्टेशनला कारवाई करण्यात आली आहे. अभिषेक अनिल बानिक (मनिषनगर नागपुर), साहिल खान वकिल खान (रा. पन्हाना जि. खंडवा म.प्र, बलविर रघुवीर सोलंकी (रा. जावल ता.जि. खंडवा म.प्र), अंकित धर्मेंद्र चव्हाण (रा. पन्हाना जि. खंडवा म.प्र), साहिद खान जाकिर खान (रा. खडकवाणी ता. कसरावद जि. खंडवा म.प्र, गणेश संतोष कोसल (रा. पन्हाना ता. जि. खंडवा म.प्र) अशी कारवाई करण्यात आलेल्या सहा जणांची नावे आहेत.
रावेर शहरातील सुमन नगर रेल्वे स्टेशन रोड परिसरात दत्तू कोळी यांच्या राहत्या घरात काही इसम मोबाईल फोन व लॅपटॉपच्या सहाय्याने ऑनलाईन गेम तयार करून लोकांना आमिष दाखवून त्यावर हारजीतचा खेळ खेळवत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकातील स.पो.नि. अंकुश जाधव, पोहेकॉ रविंद्र वंजारी. पोना सुनिल वंजारी, पोकॉ सचिन घुगे, पोकॉ विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे, समाधान ठाकुर, संभाजी बिजागरे, श्रीकांत चव्हाण आदींनी घटनास्थळी जाऊन सहा जणांविरुद्ध जुगार रेड कारवाई केली.
हे सर्व सहा जण www.wood777.com या वेबसाईटवर व्हाट्सअँप द्वारे लिंक पाठवुन लोकांना वेगवेगळे ऑनलाईन जुगार खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन देत होते. त्यांच्या कब्जातील 09 मोबाईल फोन, 2 लॅपटॉप, 1 लॅपटॉप चार्जर, एक्सटेंशन बोर्ड असा एकुण 1,15,700/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 चे कलम 4,5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.