विलासची होती भलतीच वट, त्याला लागला दुचाकीचा कट! अभिषेकने रचला त्याच्या हत्येचा कट, संपली सर्वांची वट !!

मयत विलास चौधरी

जळगाव : भुसावळ शहरातील श्रीराम नगर भागात दिनकर चौधरी व आशाबाई चौधरी हे दांम्पत्य राहतात. त्यांचा एकुलता एक मुलगा विलास याने बी.ई. मॅकेनिकलचे शिक्षण घेतले होते. विलास सध्या बेरोजगार होता. विलास याच्यावर  भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला काही गुन्हे दाखल असल्याचे देखील समजते. अंगात सळसळते तरुण रक्त असल्यामुळे विलासच्या अंगी जोश होता.

त्या जोशात तो कधीकधी आपले होश विसरुन जात असे. जरा काही मनाविरुद्ध झाले म्हणजे तो संबंधीताच्या अंगावर देखील धावून जात असे.विलास चौधरी हा भुसावळ शहरातील श्रीराम नगर भागात रहात होता. अक्षय न्हावकर, अभिषेक शर्मा हे दोघे तरुण देखील त्याच परिसरात रहात होते. तिघेही जण एकदम तरुण होते. तिघांच्याही अंगात सळसळणारे रक्त ओसंडून वहात होते.

22 ऑगस्ट रोजी विलास रहात असलेल्या श्रीराम नगर भागातून अक्षय प्रताप न्हावकर व अभिषेक राजेश शर्मा हे दोघे तरुण त्यांच्या ताब्यातील मोटार सायकलने जात होते. त्यावेळी त्यांच्या ताब्यातील मोटार सायकलचा कट विलास यास लागला. आपल्याला मोटारसायकलचा कट कसा लागला? या मुद्द्यावरुन विलासने अक्षय व अभिषेक या दोघा तरुणांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली.

या वादातून तिघा तरुणांमधे निकृष्ट दर्जाची शेरेबाजी आणि संवाद सुरु झाले. तिघांच्याही अंगात तरुण रक्त सळसळ करत होते. दुचाकीचा कट लागल्यामुळे विलासचा इगो अर्थात अहंभाव दुखावला होता. तरुणपणात हा इगो लवकर जन्माला येतो. त्याला विलास देखील अपवाद नव्हता. तिघा तरुणांमधे सुरु असलेल्या निकृष्ट दर्जाच्या संवादा दरम्यान विलासने संतापाच्या भरात अभिषेक शर्मा याच्या कानशिलात लगावली. विलासच्या हातून कानशिलात बसल्यामुळे अभिषेक शर्मा यास काही वेळ सुचलेच नाही. त्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकू लागले.

त्याचा कान आणि मन बधीर झाले. त्याला काही सुचेनासे झाले होते. मात्र कानशिलात बसल्यामुळे त्याच्यासोबत असलेल्या अक्षय न्हावकर याला देखील विलासबद्दल चिड निर्माण झाली. विलास हा गल्लीतील दादा असल्यामुळेच त्याने आपल्या कानशीलात लगावली असल्याचा समज अभिषेक शर्मा याचा झाला. कानशिलात लगावल्यानंतर “ तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी विलासने अभिषेक यास दिली होती.

त्याच्या या धमकीमुळे अभिषेक सह अक्षय न्हावकर या दोघांना विलासने जणू काही आव्हान दिले होते. या आव्हानाला प्रति उत्तर देण्यास विलासने एकप्रकारे दोघांना प्रवृत्त केले होते. त्या दिवशी तो वाद कठीण संघर्षानंतर कसाबसा निपटला.

घरी आल्यावर विलासने हा सर्व प्रकार घरी आई वडीलांना सांगितला. आपल्या मुलाला दोन समजुतीचे शब्द दिनकर चौधरी व आशाबाई चौधरी या दाम्पत्याने सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुण रक्त असल्यामुळे आपल्या आईबापाचे अनुभवाचे बोल विलासने फारसे मनावर घेतले नाही. त्याने अक्षय व अभिषेक य दोघाना बघून घेण्याची भाषा सुरुच ठेवली.

अभिषेक शर्मा व अक्षय न्हावकर हे दोघे तरुण त्या दिवशी तेथून गेले खरे मात्र विलासचा बदला घ्यायचा हे मनाशी ठरवूनच. काहीही करुन विलासला कायमची अद्दल घडवायची हे दोघांनी मनाशी निश्चीत केले होते.

अभिषेक शर्मा याने दरम्यानच्या काळात एका गावठी पिस्टलची व्यवस्था करुन ठेवली. अक्षय न्हावकर याने चाकूची व्यवस्था करुन ठेवली. 25 ऑगस्ट रोजी रात्री विलास यास अद्दल घडवण्याच्या दृष्टीने दोघांनी नियोजन सुरु केले. दोघांनी मिळून मयुरेश महाजन या तरुणास मदतीला घेतले. विलासच्या घरावर पाळत ठेवण्याची जबाबदारी दोघांनी मयुरेश याच्यावर सोपवली. विलास घरी केव्हा हजर आहे हे पाहण्याचे व तसा निरोप अक्षय व अभिषेक यांना देण्याचे काम मयुरेशवर आले होते. याकामी दोघांनी मिळून मयुरेश यास एक मोबाईल सोपवला होता. त्या मोबाईलच्या माध्यमातून संदेशाची देवाणघेवाण मयुरेश यास करायची होती.

25 ऑगस्ट रोजी रात्री  दहा  वाजेच्या सुमारास विलासचे आई वडील जेवण झाल्यानंतर टीव्ही बघत बसले होते. त्यावेळी विलास हा घराबाहेर सिमेंटच्या मोठ्या पाईपावर  बसून मोबाईलवर गेम खेळत होता. त्यावेळी त्याच्यावर लक्ष ठेवण्याचे काम मयुरेश महाजन करत होता. विलास हजर असल्याचा संदेश मयुरेशच्या माध्यमातून अक्षय व अभिषेक यांना गेला होता.

यावेळी तेथे त्यांचा मित्र आकाश पाटील हा देखील विलासच्या घराजवळ उभा होता. विलास घराबाहेर सिमेंटच्या पाईपावर बसला असल्याची माहिती मिळताच अभिषेक व अक्षय हे दोघे आपल्या हत्यारासह रात्री अकरा वाजता तेथे आले. अक्षयजवळ चाकू होता तर अभिषेक जवळ गावठी पिस्टल होते.

अक्षय न्हावकर, अभिषेक शर्मा व आकाश पाटील यांनी एकत्र येत विलासवर हल्ला चढवला. अक्षय न्हावकर याने चाकूचे वार केले. अभिषेक व आकाश या दोघांनी मिळून विलास यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.  एकाच वेळी तिघे मित्र आपल्यावर हल्ला करत असल्याचे बघून विलासने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्याने घरातील आपल्या आईवडीलांना जोरात आवाज दिला. विलासचा आवाज ऐकून त्याचे आई वडील धावतच बाहेर आले.

विलासचे आई वडील बाहेर येताच जिव वाचवण्यासाठी विलास घरात पळत गेला. घरात प्रवेश केल्यानंतर लागलीच त्याने आतून दरवाजा बंद केला. त्याच्या मागेमागे अक्षय न्हावकर व अभिषेक शर्मा पळत आले. त्यावेळी घराच्या बाहेर आकाश पाटील उभा होता.

विलासने घराचा दरवाजा आतून बंद केल्यामुळे तिघे तरुण तेथून निघून गेले. तिघे जण निघून गेल्यानंतर त्याच्या आईवडीलांनी त्याला दरवाजा उघडण्यास सांगितले. आईवडीलांचा आवाज ऐकून त्याने आतून दरवाजा उघडला. आईवडील आत येताच त्याने लागलीच दरवाजा पुन्हा लावून घेतला. विलास यास आतील खोलीत नेवून पाहिले असता त्याच्या दोन्ही हातावर व दंडावर जखमा झालेल्या होत्या.

त्या जखमांमधून रक्त निघत होते. त्याच्या हातातून निघत असलेले रक्त थांबण्यास तयार नव्हते. त्यामुळे त्याच्या आईने त्याच्या हातावर पट्ट्या बांधण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. अक्षय न्हावकर याने आपल्यावर चाकूने तर अभिषेक शर्मा व आकाश पाटील यांनी लाथाबुक्क्यांनी वार केल्याचे विलासने त्याच्या आईवडीलांना सांगितले.

जखमी विलासने तशाच अवस्थेत त्याच्या मोबाईलवरुन भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनसह मित्रांना या घटनेची माहिती दिली. दरम्यान घराच्या किचनच्या दरवाजावर हल्लेखोरांनी दगड फेकून मारण्यास सुरुवात केली. भितीपोटी विलास व त्याच्या आईवडीलांनी मधल्या खोलीचा दरवाजा देखील बंद करुन घेतला. मात्र हल्लेखोरांनी किचनच्या दरवाज्याची खालची फळी तोडून बळजबरी आत अर्धवट प्रवेश केला.

तिघा तरुणांनी दरवाजा लोटून आत येण्याचा प्रयत्न केला. अर्धवट उघड्या दरवाज्यातून अभिषेक शर्मा  याने त्याच्या हातातील गावठी पिस्टलमधून विलासच्या दिशेने गोळी झाडली. ती गोळी विलासच्या छातीवर बसली. मुलगा मेला मुलगा मेला असे त्याचे आईवडील जोरजोरात ओरडू लागले. त्यामुळे घाबरुन सर्व हल्लेखोर पळून गेले. घरात मात्र रक्ताचा सडा पडला होता.  

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड व पोलिस निरिक्षक दिलीप भागवत  यांनी घटनास्थळावर धाव घेतली. दरम्यान जखमी विलास यास तात्काळ अ‍ॅम्ब्युलन्स बोलावून डॉ. मानवतकर यांच्या दवाखान्यात नेण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र वाटेतच जखमी विलासने आपले प्राण सोडले होते. डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. 

या प्रकरणी दिनकर लक्ष्मण चौधरी  यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 800/20 भा.द.वि. 302, 323, ,34 आर्म अ‍ॅक्ट 3/25 , 3/27 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा अभिषेक शर्मा, अक्षय न्हावकर व आकाश पाटील यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनास्थळाला अप्पर पोलिस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांनी भेट देवून तपासकामी अधिकारी वर्गाला योग्य त्या सुचना दिल्या. पोलिस उपविभागीय अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. दिलीप भागवत व त्यांचे सहकारी सहायक पोलिस निरिक्षक अनिल मोरे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली. या गुन्हयाचा तपास सहायक पोलिस निरिक्षक अनिल मोरे यांच्याकडे सोपवण्यात आला. स.पो.नि. अनिल मोरे यांनी आपले सहकारी पोलिस नाईक समाधान पाटील, पोलिस नाईक रविंद्र बि-हाडे, पो.कॉ. विकास सातदिवे यांच्या मदतीने तपासाला सुरुवात केली.

क्रमाक्रमाने अभिषेक शर्मा,अक्षय न्हावकर, आकाश पाटील  यांना ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. त्यांनी दिलेल्या जवाबात विशाल टाक व मयुरेश महाजन यांची नावे पुढे आली. अभिषेक शर्मा याने विशाल टाक याच्याकडून गावठी पिस्टल विकत घेतले होते. त्यामुळे विशाल टाक याला देखील संशयीत आरोपी करण्यात आले.

गुन्हा घडण्याच्या वेळी मयुरेश महाजन हा मयत विलासवर पाळत ठेवून होता. त्याने मोबाईलच्या माध्यमातून हल्लेखोर अक्षय व अभिषेक यांना माहिती दिल्यामुळे त्याला देखील संशयीत आरोपी करण्यात आले. अभिषेक याने त्याच्या ताब्यातील मोबाईल पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने विहिरीत टाकून दिले होते. अभिषेक शर्मा यास विशाल टाक याने दिलेले गावठी पिस्टल एका ट्रक चालकाकडून घेतले असल्याचे सांगण्यात आले.  

हे पिस्टल तपासात चमेली नगर नजीक रेल्वे लाईनच्या बाजूला ठेवलेल्या रेल्वेच्या स्लीपर मधून जप्त करण्यात आले. अक्षय न्हावकर याने गुन्हयात वापरेलेला चाकू शासकीय आयटीआय रेल्वे उड्डाणपूलाखालून जप्त करण्यात आला. गुन्हयात वापरलेले दोन मोबाईल विहीरीतून काढून जप्त करण्यात आले. 

अशा प्रकारे या गुन्हयाचा तपास पोलिस उप विभागीय अधिकारी गजानन राठोड व पोलिस निरिक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. अनिल मोरे व त्यांचे सहकारी पोलिस नाईक समाधान पाटील, पोलिस नाईक रविंद्र बि-हाडे, पो.कॉ. विकास सातदिवे यांनी पुर्ण केला. सर्व संशयित आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here