जळगाव : शिपायाकडे दहा हजार रुपयांची लाच मागणाऱ्या मुख्याध्यापकाविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौतम बालुप्रसाद मिसर असे लाचेची मागणी करणाऱ्या मुख्याध्यापकाचे नाव आहे.
पारोळा येथील नागरी एज्युकेशन सोसायटी संचालित माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कुल येथे गौतम मिसर यांना मुख्याध्यापक पदी पदोन्नती मिळाली आहे. त्यांचा भाऊ मिलिंद मिसर या संस्थेचा चेअरमन आहे. मुख्याध्यापक गौतम मिसर यांनी संस्थेच्या सर्व शिपायांना त्यांच्याकडे बोलावून सांगितले होते की त्यांचा भाऊ मिलिंद मिसर यांची संस्थेच्या चेअरमन पदावर नियुक्ती झाली आहे. या संस्थेत तुम्हाला तुमच्या नोकऱ्या टिकवायच्या असतील तर प्रत्येक शिपायास दहा हजार रुपये जमा करावे लागतील अन्यथा तुम्हाला नोकरीत त्रास होईल.
या संस्थेतील तक्रारदार शिपायास लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे या तक्रारदार शिपायाने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 9 फेब्रुवारी 2024 रोजी रितसर तक्रार केली होती. या तक्रारीच्या पडताळणी दरम्यान 10 फेब्रुवारी 2024 रोजी मुख्याध्यापक गौतम मिसर यांनी तक्रारदार शिपायास लाचेची दहा हजाराची रक्कम उपशिक्षक सचिन पाटील यांच्याकडे जमा करण्यास सांगितली. त्यानुसार धुळे एसीबी कार्यालयामार्फत सापळा रचण्यात आला.
मात्र कारवाईदरम्यान मुख्याध्यापक गौतम मिसर यांनी ऐनवेळी लाचेची रक्कम उपशिक्षक धर्मेंद्र शिरोडे यांच्याकडे जमा करण्यास शिपायाला सांगितले. तक्रारदार शिपायाला दुसऱ्या शिक्षकाकडे लाचेची रक्कम जमा करण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे सापळा कारवाई स्थगित करण्यात आली. मुख्याध्यापक गौतम मिसर यांनी तकारदार शिपायाकडे 10 व 12 फेब्रुवारी 2024 रोजी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांच्याविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे एसीबीचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास सुरु आहे.