नाशिक : महामार्गावर दुचाकीस्वारांची लुटमार करणाऱ्या आंतरजिल्हा गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे. सलीम रहीम पठाण (रा. काळेमळा, शिर्डी, ता. राहाता, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या कब्जातून चोरीच्या बारा मोटर सायकली व लुटमार केलेले तीन मोबाईल फोन असा एकुण 7 लाख 75 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि वावी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त गुन्हे शोध पथकाने केलेल्या चौकशी व तपासात बबलु युसूफ शेख, रा. गणेशनगर, राहाता, जि. अहमदनगर याचा देखील या गुन्ह्यात सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे.
दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी रात्रीच्या सुमारास सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारात अज्ञात आरोपींनी तोंडास काळे कपडे बांधुन रस्त्यावरून येणा-या एका दुचाकीस्वारास अडवून, मारहाण करुन त्याच्याकडील मोबाईल व रोख 21 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला होता. या घटनेबाबत वावी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्हयातील काही संशयीत नाशिक जिल्हयाच्या सीमावर्ती भागात येणार असल्याची माहिती नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे व त्यांच्या पथकाला समजली होती. त्या माहितीच्या आधारे पथकाने पाथरे फाटा शिवारात सापळा रचुन संशयीत सलीम रहीम पठाण यास शिताफिने ताब्यात घेतले. सलीम रहीम पठाण याने त्याचा साथीदार बबलू युसुफ शेख याच्यासह कोपरगाव, राजुरी, शिर्डी, वावी परिसरात रात्रीच्या सुमारास एकटया दुचाकीस्वारांना अडवून जबरी लुटमार केल्याची कबुली दिली . त्याचा साथीदार बबलु युसूफ शेख हा येवला शहर पोलीस स्टेशनला दाखल मोटर सायकल चोरीच्या गुन्हयात अटक आहे. येवला शहर, कोपरगाव शहर, येवला तालुका, शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल मोटर सायकल चोरीचे एकुण पाच गुन्हे आणि वावी पोलीस स्टेशनला दाखल जबरी चोरीचा एक असे सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सपोनि संदेश पवार, वावी पो.स्टे.चे सपोनि गणेश शिंदे, पोउनि के. एस. सोनवणे, तसेच स्थागुशाचे सपोउनि नवनाथ सानप, पोना विनोद टिळे, हेमंत गिलबिले, संदिप नागपुरे, प्रदिप बहिरम यांच्या पथकाने कामगिरीत सहभाग घेतला.