जळगाव : सातबारा उताऱ्यावर बोजा चढवण्याच्या मोबदल्यात आठशे रुपये आणि मागील कामाचे दोनशे रुपये अशी एकूण 1000 रुपयांची लाच मागणी करणारा तलाठी आणि त्यास प्रोत्साहन देणारा खाजगी इसम अशा दोघांविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष विठ्ठल वाघमारे असे पारोळा तालुक्यातील चोरवड येथील तलाठ्याचे नाव आहे. तसेच शरद प्रल्हाद कोळी असे लाच मागणीस प्रोत्साहन देणाऱ्या खाजगी इसमाचे नाव आहे.
या प्रकरणातील तक्रारदार व त्याच्या कुटुंबीयांच्या नावे लोणी बु. ता.पारोळा येथे 6.5 एकर शेत जमीन आहे. या शेत जमिनीवर तक्रारदार यांना लोणी बु. गावातील वि. का.सो. लि. सहकारी सोसायटी मधुन कर्ज घेण्यासाठी सदर शेत जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर बोजा चढवणे आवश्यक होते. त्यामुळे तक्रारदार यांनी लोणी बु. गावाचे तलाठी सुभाष वाघमारे यांची चोरवड येथील कार्यालयात जाऊन भेट घेत चर्चा केली.
त्यावेळी तलाठी यांनी तक्रारदार यांना सांगितले की, तुमच्या व कुटुंबियांच्या नावे असलेल्या शेत जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर कर्जाचा बोजा चढवण्याच्या मोबदल्यात 4 उताऱ्याचे प्रत्येकी 200/- रुपये प्रमाणे 800/-रुपये व मागील कामाचे 200 रुपये असे ऐकुन 1000/-रुपये दयावे लागतील. त्यावेळी खासगी इसम शरद कोळी याने सदर लाच मागणीस प्रोत्साहन देऊन लाच रक्कम त्यांच्या फोन पे अकाउंट वर टाकण्यास सांगून लाच रक्कम मिळवण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध पारोळा पोलीस स्टेशन येथे लाच मागणी बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, सापळा पथकातील महिला पोहेकॉ शैला धनगर, पोकॉ प्रदिप पोळ, कारवाई मदत पथकाच्या पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस उप निरीक्षक दिनेशसिंग पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे, सुनिल वानखेडे, पोना बाळू मराठे, पोना किशोर महाजन , पोकॉ ,प्रणेश ठाकुर,पोकॉ अमोल सुर्यवंशी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.