जळगाव दि. 4 प्रतिनिधी – महात्मा गांधीजींच्या अहिंसा, सत्य या तत्त्वांमध्ये जग बदलविण्याची ऊर्जा आहे. या ऊर्जेचा सकारात्मक वापर केला तर जगातील अशांतता दूर होईल, प्रत्येकाने हे विचार प्रत्यक्ष कृतीशील आचरणात आणावे, यातून महात्मा गांधीजींना अपेक्षित रामराज्याच्या संकल्पनेतील भारत व जग घडविता येईल असे प्रतिपादन इंडोनियाचे गांधी विचारवंत पद्मश्री अगुस इंद्रा उदयन यांनी केले.
जैन हिल्स येथील गांधीतीर्थ च्या कस्तुरबा सभागृह गांधी रिसर्च फाऊंडेशन व जय हिंद लोकचळवळच्या तीन दिवसीय ग्लोबल परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त तथा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, गुजराथ विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुदर्शन अय्यंगार, जय हिंद चे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, जय हिंद महिला मंच च्या अध्यक्षा सौ. दुर्गा तांबे, सचिव नामदेव गुंजाळ आदी उपस्थीत होते. या परिषदेमध्ये राज्यभरातून 250 युवक व युवतींनी सहभाग घेतला आहे.
जागतिक शांतेसाठी महात्मा गांधीजींचे विचार हे आजही संयुक्तीक आहे. जगात शांतता प्रस्तापित करायची असेल तर गांधीजींच्या विचारांची गरज आहे. गांधी विचार हा मानवतेचा असून त्यासाठी पक्ष जात प्रांत महत्त्वाचा नाही, इंडोनिशीयामध्ये असतानाही माझ्या जीवनात गांधीजींच्या विचारांनी परिवर्तन घडविले आणि बाली येथे साधना आश्रम सुरु झाले. यातून ग्रामीण जीवनात सुद्धा यशस्वी होता येते याचे उदाहरण होता आले असे ते म्हणाले.
आत्मीक शांतीतूनच सामाजीक शांतता राखता येते – अशोक जैन – समाजात जे संशोधन, सामर्थ्य आहे, त्याचा वापर विधायक कार्यासाठी केला पाहिजे. सामाजिक भिती दूर झाली पाहिजे, महात्मा गांधीजींच्या उन्नत विचारांवर आचरण केले पाहिजे, ‘मेरी भावना’ ही प्रार्थना रोज म्हणून त्यादृष्टीने जगता आले पाहिजे. एकादश व्रत हे प्रभावी असून ते समाजातील भिती दूर करते. आपण आर्थिक समृद्ध झालो मात्र मानसीकदृष्ट्या समृद्ध झालो नाही, मानवतेबाबत आपली उपलब्धता काय याचा विचार आपण करत नाही. भौतिक प्रगती कितीही केली तरी आत्मीक शांती झाल्याशिवाय सामाजीक शांतता राखता येणार नाही, त्यामुळेच विश्वशांती ऐवजी व्यक्तीगत शांतीवर भर दिला पाहिजे. त्यासाठी महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या मार्गावर व्रतस्थपणे चालले पाहिजे, असे सांगत महात्मा गांधीजींच्या विचारांतून प्रेरित होऊन, ‘सार्थक करुया जन्माचे रुप पालटू वसुंधरेचे’ याप्रमाणे श्रद्धेय भवरलालजी जैन जगले त्यांच्या विचारातूनच गांधी विचार युवकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे सुरु असल्याचे जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांनी सांगितले. सदृढ समाज निर्मितीसाठी गांधी विचारांवर आधारित तरुणांना संघटित करण्याचे विधायक कार्य जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून होत आहे. मोलाच्या या कार्यातून संघटित, ग्रामविकासाठी प्रेरणासुद्धा मिळत आहे.
प्रास्ताविक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले, त्यात त्यांनी जय हिंद चळवळी बाबत सांगितले. वाईट गोष्टींचा समाजात प्रसार होतो मात्र चांगल्या बाबींसाठी पुढाकार तरुण घेत नाही अशी स्थिती असतानाही जय हिंद चळवळीच्या माध्यमातून आदर्श समाज निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. महात्मा गांधीजींच्या तत्वांवर प्रेम केले पाहिजे, अहिंसा हे प्रभावी शस्त्र नैतिक नेतृत्वातून प्रभावीपणे वापरले पाहिजे. जात, धर्म, भेद न मानता स्वत: ला बदले पाहिजे, यातून जग बदलेल हा विचार देणारे गांधी रिसर्च फाऊंडेशनचे गांधी तीर्थ हे प्रत्येक युवकासाठी प्रेरणास्थान आहे. असे ते म्हणाले. अशोक जैन, अगुस इंद्रा उदयन, डॉ. सुदर्शन अय्यंगार यांचा स्मृती चिन्हाद्वारे जय हिंद तर्फे सन्मान करण्यात आला. परिचय उत्कर्षा रुपवते यांनी केले. सूत्रसंचालन कपिल डोके यांनी केले. आभार प्रा. गणेश गुंजाळ यांनी मानले.