जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): मंगलाची आजी अमळनेर नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कामाला होती. कालांतराने मंगलाच्या आजीच्या जागेवर तिची आई पारोबाई ही सफाई कर्मचारी म्हणून कामाला लागली. अमळनेर शहरातील गांधलीपुरा परिसरात मंगला परशुराम घोगले ही अविवाहित तरुणी रहात होती. घरात तिच्यासह तिची आई, मोठा भाऊ जय, त्याची पत्नी शीतल आणि त्यांची मुले असा एकत्र परिवार रहात होता. मंगलाचा भाऊ जय हा एका सायकल रिपेअरिंगच्या दुकानावर कामाला जात होता. जय यास दारु पिण्याचे भारी व्यसन होते. दारूच्या व्यसनामुळे तो व्यवस्थित कामावर देखील जात नव्हता. दारुच्या व्यसनामुळे त्याची तब्येत नेहमी खराब राहत होती. त्यामुळे त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु होते. तरी देखील त्याचे दारु पिण्याचे व्यसन काही केल्या सुटत नव्हते. त्याच्या दारु पिण्याच्या त्रासाला घरातील सर्वच जण वैतागले होते. जय कामाला जात नसल्यामुळे त्याची पत्नी शितल ही नाईलाजाने बाहेर मजुरीने कामाला जात होती. मुलगा जय याच्या दारुच्या व्यसनाला वैतागून त्याची आई पारोबाई हिने तिची सुन शितल हिला नगरपालिकेत आपल्या जागेवर सफाई कर्मचारी म्हणून कामाला लावण्याचा विचार केला होता. आपली आई पारोबाई हिने सेवानिवृत्ती घेऊन वहिनी शितल ऐवजी आपल्याला तिच्या जागी सफाई कर्मचारी म्हणून लावावे असे मंगलास वाटत होते.
पारोबाई काम करत असलेल्या ठिकाणी करण मोहन घटायळे हा सफाईकर्मी कामाला होता. पारोबाई आणि करण हे दोघे सह कर्मचारी असल्यामुळे त्याचे पारोबाईच्या घरी नेहमी येणे जाणे होते. त्यातून नजरेच्या खेळात करण आणि मंगला यांचे प्रेमसंबंध जुळून आले. बघता बघता दोन वर्षाचा कालावधी उलटला. या दोन वर्षाच्या कालावधीत करण आणि मंगला यांचे प्रेमसंबंध अधिकाधिक घट्ट झाले. या दोन वर्षाच्या कालावधीत मंगला आणि करण यांचे प्रेमसंबंध घरात, गल्लीत आणि परिसरात सर्वांना कळून चुकले. मंगलामुळे आपल्या घराची समाजात आणि परिसरात बदनामी होत असल्याचे बघून तिची वहिनी शितल हिचा या प्रेमसंबंधाला विरोध होता. आपल्या आणि करणच्या प्रेमासंबंधास वहिनी शितलचा विरोध बघून मंगलाचा तिच्यावर राग होता. याशिवाय आपली आई पारोबाई ही वहिनी शीतल हिलाच तिच्या जागेवर सफाई कर्मचारी म्हणून कामावर लावण्यास इच्छुक असल्याचे बघून मंगलाचा शितलवर अजूनच राग होता. एकंदरीत मंगलाच्या मनात शितल विषयी मोठा राग निर्माण झाला होता.
दरम्यान मंगला आणि करण यांचा प्रेमाचा सिलसिला लपून छपून सुरुच होता. करण याने मंगला हिस एक मोबाईल विकत घेऊन दिला. त्या मोबाईलचे सिम देखील त्याच्याच नावावर होते. त्या मोबाईलच्या माध्यमातून मंगला लपून-छपून करण सोबत बोलत होती. इतर वेळी मंगला तो मोबाईल स्विच ऑफ करून ठेवत होती. घरातील सर्वांची नजर चुकवून करण सोबत बोलण्यात आणि त्याची गुपचूप भेट घेण्यात अविवाहित मंगला जणू काही पारंगत झाली होती. दररोज सायंकाळी दूध विकत घेण्याच्या निमित्ताने ती घरातून बाहेर जात होती. घराबाहेर गेल्यावर ती करण सोबत आईस्क्रीमच्या एका दुकानावर त्याला चोरुन लपून भेटत होती.
याशिवाय मद्यपी भाऊ जय याच्यासाठी दारुची बाटली विकत घेण्यासाठी देखील मंगला स्वतः वाईन शॉपवर जात होती. दूध आणि दारुची बाटली विकत घेण्याच्या निमित्ताने मंगला घराबाहेर पडली म्हणजे हमखास लपून छपून करणला भेटत होती. दारुची बाटली विकत घेण्यासाठी वाईन शॉप वर मंगलाचे जाणे करण यास आवडत नव्हते. त्यामुळे त्याने तिला वाईन शॉप वर जाण्यास मज्जाव केला. तो स्वतः दारुची बाटली विकत आणून मंगलाच्या हातात गुपचूप देऊ लागला. मंगला ती दारुची बाटली स्वतः आणल्याच्या अविर्भावात तिचा भाऊ जय याला रात्रीच्या वेळी पिण्यासाठी गुपचूप देत होती. अशाप्रकारे हा सर्व गुपचूप मामला सुरु होता.
मंगलाचा प्रियकर करण हा नदीवर जाऊन मासेमारी देखील करत होता. करण मासेमारी करण्यासाठी बोरी नदीवर आला म्हणजे मंगला देखील त्याला भेटण्यासाठी नदीवर जात होती. अशा प्रकारे मंगला आणि करण यांचा कधी नदीवर, कधी आईस्क्रीमच्या गाडीवर, कधी वाईन शॉपवर चोरुन लपून भेटण्याचा कार्यक्रम सुरुच होता. प्रेमसंबंध कितीही लपवले तरी ते कधी ना कधी उघड होतात. मंगला आणि करण यांचे चोरुन लपून भेटणे, मोबाईलवर चोरुन लपून बोलणे आदी चोरटे आणि चावट प्रकार तिची वहिनी शीतल हिला माहित पडले. त्यामुळे ती मंगलास या प्रकाराबाबत विरोध करत होती. हा प्रकार शितल तिची सासू अर्थात मंगलाची आई पारोबाई हिला सांगत होती. त्यामुळे पारोबाई तिची मुलगी मंगलास रागावत होती. त्यातून घरामध्ये वादाची ठिणगी पडू लागली. त्यामुळे मंगला तिची वहिनी शितलवर चिडून होती. आई पारोबाई ही नोकरीचा राजीनामा देऊन तिच्या जागेवर शितल हीस लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती मंगलास समजली. आईच्या जागेवर नोकरी करण्यास मंगला इच्छुक होती. त्यातून तिची करण सोबत दररोज खुलेआम भेट शक्य होणार होती. मात्र वहिनी शितलमुळे आपले नोकरीचे स्वप्न पूर्ण होईल अथवा नाही या बाबतीत मंगलास शंका होती. शितल आपल्या प्रेमात आणि नोकरीत अडसर ठरत असल्याचे मंगलास वाटत होते. त्यामुळे करणच्या मदतीने शितलचा काटा काढण्याचे मंगलाने मनाशी निश्चित केले.
20 सप्टेंबर 2024 हा शितलच्या जीवनातील अखेरचा दिवस मंगला आणि करण या दोघांच्या माध्यमातून नियतीने निश्चित केला. या दिवशी मंगलाने करणच्या मदतीने वहिनी शितलची हत्या करण्याचे निश्चित केले. या दिवशी मंगलाने करण यास दोन ते तीन वेळा सकाळच्या वेळी व्हाट्सअँप कॉल केला. व्हाट्स अँप कॉलच्या माध्यमातून तिने करण यास सांगितले की मी माझी वहिनी शितल हिला सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शौचास जाण्याच्या बहाण्याने बोरी नदीच्या काठालगत असलेल्या काटेरी झुडपात सोबत आणणार आहे. तू लवकर ये असे तिने त्याला फोनवर बजावले. ठरल्यानुसार सकाळी नऊ वाजता मंगला आणि शितल या दोघी नणंद – भावजय बोरी नदीच्या काठालगत काटेरी झुडपात शौचास सोबत गेल्या. त्या ठिकाणी करण घटायळे हा नदीपात्रातून दोघींजवळ मागच्या बाजूने गुपचूप आला. त्याने सोबत आणलेल्या लोखंडी सळईचा जोरदार हल्ला शितलच्या डोक्यावर मागील बाजूने केला. या अनपेक्षित जोरदार हल्ल्यात शितल जमिनीवर कोसळली. शितल जमिनीवर कोसळताच मंगलाने तिचे डोके जमिनीच्या दिशेने दाबून ठेवले. त्यानंतर लागलीच करण याने तिचा गळा दाबला आणि लागलीच सळईचा देखील पुन्हा हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या हातातील बांगड्या फूटल्या आणि काही वेळातच तिची हालचाल कायमची बंद झाली. शितलच्या चपला तिच्या पायात करण याने घालून तो नदीकिनारी निघून गेला. त्यानंतर मंगला तिच्या घरी निघून गेली.
मंगला एकटीच घरी आल्याचे बघून वहिनी शितल कुठे आहे? अशी तिला तिच्या आईने विचारणा केली. वहिनी सरपणासाठी जंगलातील लाकडे जमा करुन घरी येत आहे असे मंगलाने तिच्या आईला खोटेच सांगितले. त्यानंतर मंगलाने अंघोळ करुन अंगातील कपडे धुऊन टाकले. त्यानंतर आई पारोबाईने सांगितल्याप्रमाणे मंगला मटन विकत घेण्यास दुकानावर गेली. बराच वेळ झाला तरी शितल घरी आली नाही त्यामुळे पारोबाई विचारात पडली. तिने गल्लीतील, परिसरातील समाजाच्या लोकांकडे जाऊन शितलची विचारणा करत शोध घेण्यास सुरुवात केली. मंगलाने देखील वहिनी शितलचा शोध घेण्याचा देखावा सुरु केला. समाजाचे लोक शीतलचा शोध घेत असताना त्यांना बोरी नदीच्या पात्रालगत असलेल्या काटेरी झुडपात तिचा मृतदेह आढळून आला. या ठिकाणी तिच्या फुटलेल्या बांगड्या आणि तिच्या अंगावरील जखमा जमलेल्या लोकांना दिसून आल्या. शितलचा मृतदेह लागलीच शासकीय रुग्णालयात नेण्यात आला.
या घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विकास देवरे आदींनी आपापल्या सहकाऱ्यांच्या मदतीने घटनास्थळ आणि रुग्णालय गाठले. या घटने प्रकरणी पारोबाई परशुराम घोगले हिच्या फिर्यादीवरुन तिची सून शितल घोगले हिच्या हत्येबाबत अज्ञात हल्लेखोराविरुद्ध प्राप्त माहितीच्या आधारे अमळनेर पोलीस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गु. र. न. 461/24 बी एन एस 103 (1) प्रमाणे हा गुन्हा नोंद करण्यात आला.
या घटने पूर्वीचा सर्व घटनाक्रम पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी फिर्यादी पारोबाईकडून जाणून घेतला. तिने दिलेल्या माहितीच्या आधारे सकाळी नऊ वाजता मंगला आणि शितल या दोघी नणंद – भावजय शौचास सोबत गेल्या होत्या. मात्र येताना फक्त मंगला एकटीच आली होती. तिने तिच्या आईला सांगितले होते की वहिणी शितल जंगलातील लाकडे गोळा करुन घरी येत आहे. मात्र बराच वेळ झाला तरी शितल घरी आली नाही. त्यानंतर तिचा शोध घेतला असता ती काटेरी झुडपात मृतावस्थेत आढळून आली. त्यानंतर मंगलाची विचारपूस केली असता तिने सांगितले की मी शौचास जाऊन घरी दहा मिनिटात आली. मात्र परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता ती तब्बल अर्धा तासाने घरी आल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांचा मंगलावर संशय बळावला. संशयाची सुई मंगलावर स्थिर होऊ लागली.
याच दरम्यान पोलिसांनी परिसरातून माहिती संकलित करण्यास सुरुवात केली. मंगला आणि करण यांचे गेल्या दोन ते तीन वर्षापासून प्रेमसंबंध सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विकास देवरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना समजली. करण हा अमळनेर नगरपालिकेत सफाई कामगार होता. मयत शीतलची सासू पारोबाई ही देखील नगरपालिकेत सफाई कामगार होती. त्यामुळे करण हा तिच्याकडे गेल्या एक वर्षापासून येत होता. त्यातून त्याचे आणि मंगलाचे प्रेमसंबंध जुळून आले होते अशी माहिती पोलिसांना समजली. या प्रेमसंबंधाला मयत शितलचा विरोध होता. या प्रेमसंबंधामुळे मयत शितल आणि तिची नणंद मंगला यांच्यात वाद होत असत अशी देखील माहिती पोलीस निरीक्षक विकास देवरे यांना मिळाली. त्यामुळे संशयाची सुई करण याच्यावर देखील स्थिरावत गेली. त्यामुळे चौकशीकामी अगोदर त्याला ताब्यात घेण्यात आले.
पोलिसी खाक्या बघून करण याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. मंगला हिने मला दोन ते तीन वेळा फोन करून गुन्हा करण्यासाठी बोलावले होते अशी कबुली त्याने दिली. लोखंडी सळईने आपण मंगलाच्या सांगण्यावरुन शितलला मारहाण केली असे त्याने कबूल केले. पारोबाईच्या जागेवर सफाई कामगार म्हणून तिची सून शितल ही लागणार होती अशी माहिती मंगलास समजली होती. मात्र आईच्या जागेवर मंगला हिला लागायचे होते. त्यामुळे मंगला आणि करण हे दोघे एकमेकांना खुलेआम भेटू शकणार होते. घटनेच्या दिवशी लोखंडी सळई मारल्यानंतर शितल खाली कोसळली. त्यानंतर आपण तिचा गळा दाबला, मंगलाने तिला जमिनीच्या दिशेने दाबून ठेवले होते असा घटनाक्रम करण याने पोलिसांना कथन केला. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यातील मंगलाची चौकशी केली असता तिने देखील आपला गुन्हा कबुल केला. दोघांना अटक करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी हे. कॉ. किशोर पाटील करत आहेत. या गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे, हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील, संदेश पाटील, संतोष नागरे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील, सिद्धांत शिसोदे आदींचे सहकार्य लाभत आहे.