जळगाव : धरणगाव तालुक्यातील चांदसर येथील कोतवाल अमोल मालचे यांच्या घराजवळ गावठी पिस्टलने फायर करणा-या मुख्य आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. धरणगाव तालुक्यातील वाकटुकी येथील रहिवासी निवृत्ती उर्फ गोपाल गजानन सोनवणे (कोळी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो पोलिसांच्या अभिलेख्यावरील अट्टल गुन्हेगार आहे. गेल्या कित्येक दिवसापासून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक त्याच्या मागावर होते. तो धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील आठवडे बाजारात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना समजले होते. त्या माहितीच्या आधारे सापळा रचून त्याला शिताफीने अटक करण्यात पोलीस पथकाला यश आले.
चांदसर तालुका धरणगाव येथील जुने वाद आणि रेती वाहतुकीच्या कारणावरुन त्याने 17 सप्टेंबर रोजी गावातील कोतवाल अमोल मालचे यांच्या घराजवळ गावठी पिस्टलने फायरिंग केली होती. या घटनेनंतर तो फरार झाला होता. या गुन्ह्याच्या घटनेत त्याची मुख्य भुमिका होती. अथक प्रयत्न करुनही तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. मात्र 8 ऑक्टोबर रोजी पिंप्री खुर्द या गावी साप्ताहिक बाजारातून त्याला अटक करण्यात यश आले.
या घटने प्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला गु.र.न. 354/24 भारतीय न्याय संहिता कलम 132, 110, 112, 189 (2), 189 (4), 190 सह कलम 3, 25 शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, हेड कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील, दीपक माळी, रवींद्र पाटील व महेश सोमवंशी आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी व कामगिरीत सहभाग घेतला. अटकेतील निवृत्ती उर्फ गोपाल गजानन सोनवणे (कोळी) यास त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेल्या गावठी पिस्टल व मॅगझीनसह धरणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास सुरु आहे.