जळगाव : जळगाव शहरात काल 11 ऑक्टोबर च्या सायंकाळी सुरु झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरु होता. यावेळी विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट मोठ्या प्रमाणात झाला. जळगाव शहरातील योगेश्वर नगर परिसरात वीज पडल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात वित्तहानीचा सामना करावा लागला.
जळगाव पोलीस दलातील सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार दिलीप येवले यांच्या चार चाकी वाहनासह घरातील विविध वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दिलीप येवले यांच्या घराचे प्लास्टर पडून ते चार चाकी वाहनाच्या काचेवर कोसळले. त्यामुळे गाडीचा काच फुटला. याशिवाय घरातील एसी, फॅन आणि इतर इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे देखील नुकसान झाले. हाच प्रकार परिसरातील इतर रहिवाशांच्या घरात देखील कमी अधिक प्रमाणात झाला. इतर रहिवाशांच्या घरातील टीव्ही, फ्रिज अशा वस्तूंचे नुकसान झाले आहे.