विद्यापीठांच्या गुणपत्रिकांची कमाल १५ हजारात विक्री

मुंबई : भारतातील विविध शैक्षणिक मंडळे आणि विद्यापीठांच्या गुणपत्रिका तसेच प्रमाणपत्रांची किमान २ ते कमाल १५ हजार रुपयात विक्री होत असल्याचा खळबळजनक प्रकार गुन्हे शाखेच्या कारवाईतून समोर आला आहे. गुन्हे शाखेने मुनावर अहमद सय्यद (३४) आणि हासमुद्दीन खैरुद्दीन शहा (३३) या जोडीला अटक केली आहे.
गुन्हे शाखेच्या कक्ष २ ला या टोळीची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय निकुंबे, तपास अधिकारी मिलिंद काठे, संतोष साळुंखे, गुंडेवाड, राणे, पटेल आणि अंमलदार आदींनी तपास सुरु केला. बनावट ग्राहकाच्या मदतीने पथकाने सय्यदची भेट घेतली. त्यानुसार आरोपीने दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणपत्रिका, वाणिज्य शाखेचे प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाच्या प्रमाणपत्रासाठी १९ हजार ६०० रुपये खर्च लागणार असल्याचे सांगितले. त्यानुसार रकमेचा व्यवहार ठरला. ठरल्यानुसार २ सप्टेंबर रोजी आरोपीने प्रमाणपत्र तयार झाल्याचा निरोप दिला.

ठरल्यानुसार वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे ३ सप्टेंबर रोजी भेट घेण्याचे ठरले. त्यानुसार पथकाने सापळा तयार केला. मोटार सायकलने आलेल्या तरुणाला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्याच्याजवळ असलेले बनावट प्रमाणपत्रे जप्त करण्यात आली. त्याच्याविरुद्ध बीकेसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाकडून चेंबूरच्या वाशी नाका परिसरात छापा टाकण्यात आला. तेथील कार्यालयातील संगणकावर विविध शैक्षणिक मंडळ, विद्यापीठ यांच्या गुणपत्रिका, ना हरकत प्रमाणपत्रे, शिक्के आदी मुद्देमाल मिळून आला. कागदपत्रासह संगणक पथकाने ताब्यात घेतला. दोघांना न्यायालयात हजर केले असता ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here