फसवणुकीची अकरा लाखाची रकम तक्रारदारास परत

जळगाव : शेअर मार्केटमध्ये नफ्याचे अमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 11 लाख 10 हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहे. हस्तगत करण्यात आलेली रक्कम पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडून तक्रारदार फिर्यादीस परत करण्यात आली. 

फसवणुकीच्या या घटनेतील तक्रारदारास फसवणूक करणाऱ्या टोळीकडून शेअर ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर नफ्याचे अमिष दाखवण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून तक्रारदाराने त्यांना सांगण्यात आलेल्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करुन शेअर ट्रेडिंगचे अँप्लीकेशन इन्स्टॉल केले होते. सुरुवातीला गुंतवणुकदारास मोठ्या प्रमाणात लाभ झाला. अशा प्रकारे फसवणूक करणा-या टोळीने गुंतवणूकदाराचा विश्वास संपादन केला. 

त्यानंतर मोहाला बळी पडून तक्रारदाराने मोठी रक्कम गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यांना झालेला नफा हा फक्त डिजिटल वेबसाईट व मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये दाखवला जात होता. गुंतवणुकीची रक्कम काढण्यासाठी पुन्हा काही पैसे भरल्यानंतर ती रक्कम काढता येईल, अशी विविध कारणे सांगुन तक्रारदाराकडून 1 कोटी 5 लाख 23 हजार 341 रुपयांची फसवणुक झाली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सायबर पोलीस स्टेशनला रितसर फिर्याद देत गुन्हा दाखल केला. 

या गुन्हयाच्या तपासात सायबर पो.स्टे. च्या तपास पथकाने मुकेश पिता सुभाष, अंकुश पिता सतपाल (दोघे रा- गांव नादोरी, तहसिल भुना, जिल्हा फतेहाबाद हरियाणा), दिपांकर गौतम पिता राजेंद्र (भायखळा पश्चिम), नुरमोहम्मद अब्दुल रशिद असे आरोपी निष्पन्न झाले. यातील अंकुश यास हरियाणा येथून तर दिपांकर व नूर मोहम्मद या दोघांना मुंबई येथून अटक करण्यात आली होती. 

फसवणूक करणारे आरोपी फसवणुकीची रक्कम बँक खात्यावर स्विकारुन बँकेतून विड्रॉल करत होते. अटकेतील आरोपींकडून 11 लाख 10 हजाराची रक्कम हस्तगत करण्यात आली. ती रक्कम तक्रारदारास परत करण्यात आली. पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि दिगंबर थोरात, सहाय्यक फौजदार देवेंद्र जाधव, पोहेकॉ दिलीप चिंचोले, पोहेकॉ शिवनारायन देशमुख, व पोकॉ दिपक सोनवणे यांचे पथक फतेहबाद, हरीयाना, मुंबई येथे रवाना करण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here